राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम २०१४ सालापासून सुरु करण्यात आली. व्यक्तीच्या उत्पन्नावर त्यांचे वर्गीकरण करून त्याप्रमाणे शासनाने सफेद, केशरी,पिवळे शिधा पत्रिका देण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन मोहीम मागील वर्षापासून कमी अधिक प्रमाणामध्ये सुरु आहे. त्यामुळे अनेक बाहेर गावाहून आलेले मजूर, इतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तीचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. एकतर उत्पन्नाचे साधन, मोलमजुरी बंद झाल्याने कमवायचे कसे आणि खायचे काय, कुटुंबाला पोसायचे कसे असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले.
पिवळ रेशन कडे असलेल्यांना शासनाकडून मोफत धान्याचा पुरवठा केला जात होता. फक्त केशरी रेशन कार्ड धारकांसाठी सुविधा उपलब्ध नव्हती. परंतु, शासनाने मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून आलेल्या कोरोना संकटामुळे मे ते ऑगस्ट या चर महिन्यांमध्ये जीवनावश्यक धान्य कमी दारामध्ये उपलब्ध करून दिले. त्यामध्ये तांदूळ १२ रुपये प्रती किलो, गहू ८ रुपये किलो, या सवलत दरामध्ये कुटुंबातील प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य उपलब्ध करून दिले होते.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन हर तर्हेने प्रयत्न करत आहे, जिल्ह्यातील गरीब, निराधार जनतेचे हाल होऊ नये म्हणून शिवभोजन थाळी सुरु केली. परंतु पुन्हा आलेली लॉकडाऊनची स्थिती पाहता शासनाने केशरी रेशन कार्ड धारकांना १ जून पासून सवलतीच्या दारामध्ये धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या नागरिकांना आठ रुपये प्रति किलो दराने गहू आणि १२ रुपये प्रति किलोने तांदूळ याप्रमाणे प्रति व्यक्तीला पाच किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळू शकणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ३ लाख ९० हजार ८०८ केशरी शिधापत्रिका धारकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. आणि काही ठिकाणी शिल्लक साठ संपेपर्यंत हे धान्य वाटप केले जाणार आहे.