पावसाळ्याला सुरुवार झाली असून, नैसर्गिक आपत्तीचा धोका या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतो. ऐनवेळी मदत व बचावकार्य करताना अडथळे येऊ नयेत, म्हणून पुढील काही दिवसांत एनडीआरएफच्या तुकड्या जिल्ह्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात कमीत कमी हानी होईल, शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. तशा सूचना चिपळूण मधील मान्सूनपूर्व बैठकीत देण्यात आल्या आहेत.
हवामान विभागाने भाकीत केल्याप्रमाणे या वर्षी शंभर टक्केपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. ही कृषी व अन्य क्षेत्रासाठी नक्कीच सुखकारक बाब आहे. असे असले तरी, कमी कालावधीत जास्त पाऊस पडणे, ढगफुटी सदृश्य अति वृष्टी होणे, धरणक्षेत्रात अतिवृष्टी यामुळे महापूराची स्थिती निर्माण होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी किंवा संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे. शासकीय यंत्रणेने तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा आढावा घेतला आहे. त्यानुसार, तालुका व ग्रामस्तरावर बैठका सुरू आहेत.
संबंधित विभागाने केलेली तयारी पाहता संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर निश्चितपणे मात करता येईल. प्रशासनाच्या गाठीशी २०२१ मध्ये अचानक उद्धाभवलेल्या महापुराचा फार मोठा अनुभव आहे. महापूर आला, तेव्हा यंत्रणा बेसावध होती. इतकी मोठी हानी होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. त्याही परिस्थितीत शासकीय यंत्रणेने महापुरावर मात केली, हाच विश्वास बाळगून प्रशासन संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे.
नैसर्गिक आपत्तीबाबत त्वरित माहिती मिळण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालय सुरू करण्यात आले असून, त्या ठिकाणी २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन केलेले आहेत. गावपातळीवरही ही यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे. तालुक्यातील सर्व यंत्रणांमध्ये योग्य तो समन्वय राहावा, यासाठी आपत्ती प्रतिसाद यंत्रणा ही लागू करण्यात आली आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जिल्हा प्रशासनाकडून पुरवठा झाल्याचे आमदार निकम यांनी सांगितले.

