चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी रत्नागिरी जिल्हयातील दूध संकलन बंद करण्याच्या आदेशास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री ना. सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोकणातील ग्रामीण भागातील शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाद्वारे उदरनिर्वाह करतो. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील दूध संकलन दि. १६ जून २०२२ पासून बंद करण्याबाबत दुग्ध व्यवस्थापक, शासकीय योजना यांनी सर्व संबंधित संस्थांना कळविले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दररोज २ लाख ५५ हजार लिटर दुधाचे उत्पादन करण्यात येते. सुमारे १९ हजार १३३ शेतकरी दुधाचे उत्पादन करतात.
मात्र, दूध संकलनाची बिले वेळेवर न झाल्याने सुमारे ५० लाख रुपये अद्यापही प्रलंबित आहेत. तसेच दुधाचे संकलन करून त्याच्या वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने दूध संकलन बंद करत असल्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील दुग्ध व्यवस्थापकांनी संबंधित संस्थांना कळवले आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी दुग्ध उत्पादनात आघाडीवर नसला , तरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी दुग्ध उत्पादनामुळे मोठा हातभार मिळतो. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय संपुष्टात येण्याची भीती वाटत आहे.
हा व्यवसाय बंद होणार नाही , यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे . वाहतुकीच्या खर्चाबाबत पुर्नआराखडा तयार करून प्रलंबित बिले अदा करून रत्नागिरी जिल्ह्यातील दूध संकलन बंद होणार नाही , यासाठी आपल्या स्तरावरून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत आणि दूध संकलन बंद करण्याच्या आदेशास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.