लांजा तालुक्यातील कोर्ले येथील आर्या राजेश चव्हाण या ७ वर्षीय बालिकेच्या मृत्यूप्रकरणी या आत्महत्या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आर्याची आई माया राजेश चव्हाण यांनी लांजा पोलिस ठाण्यात दिलेल्या घातपाताच्या फिर्यादीनुसार आर्याचे वडील, तसेच आजी-आजोबा आणि इतर अशा एकूण आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता आर्याने गळफास लावून आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला हे तपासात स्पष्ट झाले आहे.
शनिवारी घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी भेट देऊन पाहणी केली होती व पुढील तपासासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. ११ जून रोजी लांजा तालुक्यातील कोर्ले सहकारवाडी येथील आर्या राजेश चव्हाण या सात वर्षीय बालिकेने मालिकेतील घटना बघून आत्महत्या केल्याची बातमी पसरली होती. त्यामुळे सुरुवातीला राजेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आर्याने आत्महत्या केल्याचे गृहित धरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माया राजेश चव्हाण रा. फलटण जि. सातारा हिचे २००५ मध्ये राजेश सुभाष चव्हाण रा. कोर्ले लांजा याच्याबरोबर लग्न झाले होते. राजेश चव्हाण दररोज दारू पिऊन माया हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ तसेच मारहाण करत असे. राजेश याच्या सततच्या त्रासाला कंटाळून माया ही आपल्या तीन्ही मुलींना घेऊन आपल्या माहेरी फलटण येथे राहायला गेली होती.
याच दरम्यान राजेश याने काजल हिच्याशी दुसरा विवाह केला होता. पहिली पत्नी हयात असताना दुसरे लग्न केले त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीपोटी राजेश याने माया यांच्याशी पुन्हा चांगले वागण्याचे नाटक करून आपल्या दोन्ही मुली आर्या आणि अनुजा यांना घेऊन तो कोर्ले येथे रहायला आला.
मात्र कोर्ले येथे आल्यानंतर दिनांक ११ जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान माया यांच्या सासू सुनंदा सुभाष चव्हाण आणि चुलत नणंद अनिता नागेश चांदेकर यांनी आर्या हिचा घरात गळा आवळून खून केला. यासाठी या दोघींना इतर सहा जणांनी सहकार्य केले असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी एकूण आठ जणांवर भादवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे अधिकचा तपास करत आहेत.