HomeEntertainmentबॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' म्हणतात; वैभव मांगलेंचा खळबळजनक खुलासा!

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना ‘घाटी’ म्हणतात; वैभव मांगलेंचा खळबळजनक खुलासा!

"तिथे चमकलं म्हणजे भारी का?" हिंदी चित्रपटसृष्टीच्या मानसिकतेवर अभिनेते वैभव मांगले कडाडले

आपल्या अष्टपैलू अभिनयाने मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजवणारे सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले नेहमीच त्यांच्या परखड विचारांसाठी ओळखले जातात. कोणत्याही विषयावर रोखठोक भाष्य करणाऱ्या वैभव मांगले यांनी आता थेट बॉलिवूडमधील एका कटू सत्यावर बोट ठेवलं आहे. बॉलिवूडमध्ये (हिंदी चित्रपटसृष्टीत) मराठी कलाकारांना नेमकी कशी वागणूक मिळते, याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून मनोरंजन विश्वात खळबळ उडवून देत आहे.

“तिथे चमकलं म्हणजे आपण भारी कलाकार का?”

अनेकदा एखादा मराठी कलाकार हिंदी सिनेमात किंवा वेब सीरिजमध्ये झळकला की त्याचे खूप कौतुक केले जाते. याच मानसिकतेवर वैभव मांगले यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, “हे… हे ‘मराठी कलाकार’ हिंदीत चमकणार, चमकले, चमकतील… हे फालतू कोडकौतुक पहिलं बंद केलं पाहिजे. तिथे चमकलं म्हणजे आपण भारी कलाकार का? हा निव्वळ बिनडोकपणा आहे.”

मराठी कलाकारांना थेट ‘घाटी’ संबोधतात!

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांचा सन्मान केला जात नाही, असा आरोप करत वैभव मांगले यांनी पुढे एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला. ते म्हणतात, “माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर सोडले तर तिथे मराठी कलाकारांना कोणीही फारशी किंमत देत नाही. तिथे आपल्या कलाकारांना चक्क ‘घाटी’ म्हणून संबोधलं जातं. त्यांच्या मनात आपल्या कलाकारांबद्दल एक वेगळाच आकस (राग/द्वेष) आहे. त्यांनी मराठी कलाकारांना कधीच योग्य किंमत दिली नाही. म्हणजे आमचं काम कमी दर्जाचं आणि त्यांचं काम अव्वल, ही निव्वळ फालतुगिरी आहे.” बॉलिवूडमध्ये मराठी पार्श्वभूमी असलेल्या छोट्या-मोठ्या भूमिका दिल्या जातात, पण कधीही हिरो किंवा हिरोईन म्हणून मुख्य प्रवाहात स्वीकारलं जात नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

आमचे मराठी कलाकार खूप मोठे आहेत!

मराठी इंडस्ट्रीतील प्रतिभावान कलाकारांचा अभिमान बाळगत त्यांनी प्रशांत दामले, उमेश कामत, प्रिया बापट, भरत जाधव, मुक्ता बर्वे, निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, प्रसाद ओक आणि स्पृहा जोशी अशा अनेक दिग्गज कलाकारांची नावे घेतली. “हे सर्व कलाकार मराठी इंडस्ट्रीतील अत्यंत महत्त्वाचे आणि खूप खूप मोठे कलाकार आहेत,” असं वैभव यांनी अभिमानाने नमूद केलं.

मला कधीच बॉलिवूडची भुरळ पडली नाही!

या पोस्टनंतर काही लोक टीका करतील याचा अंदाज बहुदा वैभव यांना आधीच असावा. त्यामुळे टीकाकारांना आधीच चोख उत्तर देत त्यांनी पोस्टच्या शेवटी लिहिलं, “आता काही महाभाग म्हणतील की, याला कोणी हिंदीत काम दिलं नाही म्हणून हा असा बोलतोय. पण मी त्यांना सांगून ठेवतो की, मला कधीही त्या हिंदी इंडस्ट्रीने भुरळ घातली नाही. तिथे काही काम केलं तरच आपण भारी कलाकार ठरतो, असं मला कधीच वाटलं नाही.”

वैभव मांगले यांच्या या रोखठोक आणि धाडसी पोस्टवर आता सोशल मीडियावरील नेटकऱ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्यांच्या या भूमिकेचे जोरदार समर्थन केले असून, मराठी कलाकारांच्या प्रतिभेचा सन्मान झालाच पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular