पावसाने सलग तीन दिवस विश्रांती घेतली आहे. मागील पंधरा दिवसांत पडलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील भात लावण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. आता रोपांची व्यवस्थित रुजवात होण्यासाठी हलका पाऊस आवश्यक आहे. तसे झाले नाही तर रोपांचा फुटवे व्यवस्थित येणार नाहीत आणि उत्पादनावर परिणाम होईल. हे वातावरण असेच राहिले तर सुरुवातीलाच अडचणी निर्माण होऊ शकतात. मंगळवारी (ता. ८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २.७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच दिवशी गतवर्षी १८२ मिमी पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २३४३ मिमी नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा थोडा पाऊस अधिक झाला आहे.
जून महिन्यात उशिराने पावसाचे आगमन झाल्यामुळे भात लावणीचे वेळापत्रक गडबडले. लावण्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबल्या होत्या. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाचा जोर कमी झाला. दुपारी उन्हाचा मारा सहन करावा लागतो. हवामान विभागाकडून ग्रीन अर्लट दिला आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांत पाऊस यथातथाच राहणार आहे. भात लावण्यानंतर काही काळ मळ्यामध्ये पुरेसे पाणी राहणे आवश्यक असते. तसे झाले तर रोपांची मुळं व्यवस्थित रुजून येतील अन्यथा फुटवे येणार नाहीत. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. सध्या दिवसातून एखादी सर पडत असल्याने ती भातशेतीला पुरेशी आहे.
परंतु जमिनीला भेगा गेल्या तर रोपांना फुटवे चांगले येणार नाहीत. त्यासाठी जमिनीला भेगा पडू नयेत याची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे. जिथे शक्य आहे, तिथे शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या तुलनेत तीस टक्के क्षेत्र कातळावर आहे. ही शेती पावसावरच अवलंबून असते. त्याला मोठा फटका बसू शकतो. दरम्यान, मागील चोवीस तासात मंडणगड ४, दापोली १, खेड ६, चिपळूण २, संगमेश्वर ६, रत्नागिरी १, लांजा ३ आणि राजापूर २ मिमी पाऊस झाला आहे. गुहागर तालुक्यात नोंदच झालेली नाही.