दुर्मिळ पोपट प्रजातीच्या पक्षांच्या तस्करी प्रकरणी चिपळूण तालुक्यातील कोंढेमाळ येथील एका विक्रेत्याला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. त्याच्या कडील पक्षी जप्त करण्यात आले आहेत. वनपरिमंडळ अधिकारी चिपळूण यांना जितेंद्र धोंडू होळकर, रा. कोंढेमाळ ता.चिपळूण हे पोपट पकडून विक्री करत असलेबाबत गुप्त माहिती मिळाली होती. यावरुन मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी वन विभागाचे विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश्री कीर, वनपरिमंडळ अधिकारी दौलत भोसले, उमेश आखाडे, सुरेश उपरे व वनरक्षक राजाराम शिंदे, अश्विनी जाधव इत्यादी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी जितेंद्र धोंडू होळकर, यांच्या घरी व गुरांच्या गोठ्यामध्ये धाड टाकली.
आजूबाजूचा परिसरामध्ये पहाणी दरम्यान जितेंद्र होळकर यांच्या घराशेजारील श्री. प्रभाकर जिवा करंजकर यांच्या लाकडाच्या खोपटीत दोन पिंज-यामध्ये पोपट प्रजातीमधील प्लम हेडेड पॅराकीट (मराठी नाव तुईया) या प्रजातीची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ पक्षी आढळून आले आहेत. या पक्षांबाबत जितेंद्र होळकर यांचेकडे विचारणा केली असता हस्तगत करण्यात आलेल्या दोन पिंजऱ्यातील एकूण १२ पोपट हे माझेच आहेत. मी गुरे चारण्यासाठी गावाजवळील डोंगरावर गेलो असता लाकडाच्या डोलीतून सुमारे ४-५ महिने व १ वर्षापूर्वी ताब्यात घेतले आहेत. तसेच यापुर्वी मी १० ते १२ जणांना पोपट विकले असल्याचे सांगितले.
सध्या त्याच्याकडे असलेल्या पक्षांची जोडी दोन ते तीन हजार रूपयांना विक्री करणार असल्याबाबत कबूलीही त्याने दिल्याचे सांगितले. याबाबत सविस्तर तपास वन विभागामार्फत सुरू आहे. या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ सुधारणा २०२२ अन्वये वनपाल चिपळूण यांचेकडील प्रथम गुन्हा रिपोर्ट क्र. ०२/२०२३ अन्वये जितेंद्र धोंडू होळकर यांचेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.