तीन महिने रखडलेले मानधन यांसह जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेपुढे आंदोलन केले. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मानधनाचा प्रश्न लवकरच सुटेल, असे आश्वासन दिले. जिल्ह्यातील शेकडो आशा व गटप्रवर्तकांनी एकत्र येऊन आज सकाळी जिल्हा परिषदेवर धडक दिली. या वेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांना निवेदन दिले. तसेच विविध मागण्यांवर चर्चा केली. या प्रसंगी डॉ. आठल्ये यांनी शिष्टमंडळाला सांगितले, मागील तीन महिन्याचे आशा व गटप्रवर्तक महिलांचे थकीत मानधन लवकरात लवकर देण्यात येईल. ज्या प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये सीईओचे नेमलेले नाहीत त्या ठिकाणी ते नेमण्याची मागणी प्रशासनाने केली आहे. ऑनलाइन कामासाठी ज्या आशांचे प्रशिक्षण झालेले नाही त्यांना लवकरच प्रशिक्षण दिले जाईल.
या शिष्टमंडळात शंकर पुजारी, सुमन पुजारी, पल्लवी पारकर, संजीवनी तिवरेकर, संचिता चव्हाण, तनुजा कांबळे व वृंदा विखारे आदी उपस्थित होत्या. निवेदन दिल्यानंतर जिल्हा परिषदेसमोर सभा झाली. या वेळी पिंपरी चिंचवडमधील बांधकाम कामगारांचे नेते दीपक म्हात्रे यांनी आशा महिलांनीसुद्धा पुढाकार घेऊन बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यास मदत करावी, असे आवाहन केले. तसेच याबाबत काही अडचण आल्यास मदत करू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आशा व गटप्रवर्तकांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.