पिंजऱ्यातील मत्स्यपालन पद्धतीने मत्स्यसंवर्धन प्रकल्पांना जिल्ह्यात चालना मिळत आहे. या उद्योगातून तरुणांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. जिल्ह्यात प्रकल्प आणि पिंजऱ्यांची गेल्या तीन वर्षांमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये ६ प्रकल्पातून १० लाख ३३ हजार उत्पन्न मिळाले होते तर २०२३-२४ मध्ये ८ प्रकल्पातून २२ लाख ८७ हजार एवढे जिताडा माशाचे उत्पादन मिळाले. वर्षात सुमारे साडेबारा लाखाने उत्पन्न वाढले आहे. २०२४-२५ मध्ये प्रकल्पांमध्ये आणखी वाढ झाली आहे; परंतु त्याची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून मत्स्यपालनामध्ये मोठी वाढ होत आहे. शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेत अनेक तरुण मत्स्यपालनाकडे वळू लागले आहेत. याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून पिंजरा मत्स्यसंवर्धन संकल्पना पुढे येऊ लागली आहे. शासनाच्या मत्स्यपालन विभागाकडून ही योजना राबवण्यात येत आहे. बंदिस्त पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन करणे ही उच्च तंत्रज्ञानावर आधारित पद्धत आहे. या द्वारे अधिक मत्स्योत्पादन मिळू शकते.
राज्यातील कुपोषणासाठी समस्या हाताळण्यासाठी प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांची उपलब्धता वाढवण्यासाठी पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन प्रकल्प स्थापित करून रोजगार निर्मितीच्या उद्देशाने राज्यातील मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये राजापुरात ४ प्रकल्पांमध्ये १६ पिंजरे लावले होते. त्यामध्ये जिताडा माशाचे ७ हजार २०० बीज सोडण्यात आले. यातून ६ लाख ४९ हजार २६६ उत्पन्न मिळाले. रत्नागिरीत २ प्रकल्पात ८ पिंजरे लावले होते. त्यामध्ये ३ हजार ६०० जिताडा माशांचे बीज सोडण्यात आले. यातून ३ लाख ८३ हजार ७५८ एवढे उत्पन्न मिळाले. २४ पिंजऱ्यांतून सुमारे १० लाख ३३ हजार २४ एवढे उत्पादन मिळाले. २०२३-२४ मध्ये राजापुरात ४ प्रकल्पांमध्ये १६ पिंजरे लावले होते. त्यामध्ये ७ हजार २०० जिताडा बीज सोडण्यात आले. यातून ९ लाख ३ हजार उत्पन्न मिळाले. गुहागरमध्ये एका प्रकल्पात ४ पिंजरे सोडले होते. त्यामध्ये १ हजार ८०० जिताडा माशाचे बीज सोडले. यातून २ लाख ७० हजार उत्पादन मिळाले. एकूण ८ प्रकल्पातील ३२ पिंजऱ्यांमध्ये २२ लाख ८७ हजार ६७५ एवढे उत्पन्न मिळाले.
रत्नागिरीत लावले १२ पिंजरे – रत्नागिरीत ३ प्रकल्पांमध्ये १२ पिंजरे लावले होते. यामध्ये ५ हजार ४०० जिताडा माशाचे बीज सोडण्यात आले. यातून ११ लाख १४ हजार ६७५ उत्पादन मिळाले.