मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या कशेडी घाट ते परशुराम घाट या दरम्यान अनेक ठिकाणी अर्धवट असणाऱ्या कामांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून महत्वाच्या ठिकाणी वर्षानुवर्षे पुलांची कामे देखील प्रलंबित आहेत, अर्धवट सर्व्हिस रोड तसेच अर्धवट अवस्थेत रखडलेले पूल कधी पूर्ण होणार असा प्रश्न कोकणवासीयांना पडला आहे. गेल्या सतरा वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु आहे, त्यातीलच एक पॅकेज म्हणजे कशेडी घाट ते परशुराम घाट हे ५३ किलोमीटरच्या अंतरादरम्यान अनेक ठिकाणी महामार्गांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. खेडमधील वेरळ याठिकाणी तीन तालुक्यांशी जोडणारे खेड रेल्वेस्टेशन आहे.
त्याठिकाणी तर विचित्र परिस्थितीमध्ये रस्त्यांचे काम झाले आहे आणि ते देखील अर्धवट अवस्थेत आहे, त्या ठिकाणी असलेला पूल गेली कित्येक वर्षे अपूर्णावस्थेत आहे. जुन्या मुंबई गोवा महामार्गावरून या ठिकाणी वाहतूक सुरु असते, जुना पूल तसाच ठेऊन नवीन पुलाचे काम भराव रास्ता करून उंचावर केला गेला आहे. त्यामुळे महामार्गाची एक मार्गिका खालून तर दुसरी मार्गिका उड्डाणपुलावरून भरावाच्या रस्त्याने जाणार आहे, या विचित्र परिस्थितीमुळे आत्तापासूनच अपघातांची मालिका सुरु झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील याच कशेडी घाट ते परशुराम घाट या टप्प्यात कशेडी बोगदा पण येतो नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवाच्या काळात बोगद्याची एक लेन चाकरमान्यांच्या प्रवासासाठी सुरु करण्यात आली होती, मात्र पुन्हा व ती बंद करण्यात आला आहे, २०२३ मध्ये दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, २०२३ संपत आला तरीदेखील बोगद्याचे काम अर्धवटच असल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणच्या विकासाचा मार्ग म्हणून मोठ्या आशेने या मुंबई-गोवा महामार्गाकडे कोकणवासीय पाहत होते मात्र ठेकेदारांची मनमानी आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे आता हा महामार्ग अर्धवट असून आता तो अपघातांना देखील कारणीभूत ठरत असल्याचे चिन्न पाहायला मिळतंय.