सुमारे ४८ वर्षांपूर्वी १९७७ साली मुंबईत एका महिलेवर चाकू हल्ला करणाऱ्या आणि या प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर पोलीसांच्या हातावर तुरी देत कोकणात जाऊन लपलेल्या एका आरोपीला पोलिसांनी तब्बल ४८ वर्षांनंतर शोधून काढलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील करंजणी गावात तो लपला होता. तेथून त्याला अटक करण्यात आली. चंद्रशेखर मधुकर कालेकर असे या आरोपीचे नाव असून तो सध्या ७१ वर्षांचा आहे. अटक केली त्यावेळी त्याला त्याचा गुन्हाही आठवत नव्हता. पोलीसांनी त्याला शोधण्यासाठी गेली काही वर्षे अक्षरशः जंग जंग पछाडले. आरोपीच्या नावाशिवाय हाती काहीच धागादोरा नसताना पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केवळ नावावरून आरोपीचा शोध घेऊन अखेर त्याला बेड्या ठोकल्याच. पोलीसांनी अक्षरशः सूतावरून स्वर्ग गाठला असे म्हणता येईल, अशी ही चित्रपटात शोभेल अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे.
१९७७ चा गुन्हा – चंद्रशेखर कालेकर मुंबईतील लालबाग परिसरात वास्तव्यास होता. १९७७ साली काही किरकोळ वादातून त्याने एका महिलेवर हल्ला केला. चाकूने सपासप वार केले होते. या प्रकरणी त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. तसेच पोलिसांनी त्याला अटकही केली. मात्र कोर्टातून जामीन मिळाल्यावर तो पसार झाला. तब्बल ४८ वर्षे तो पोलिसांना हुलकावणी देत होता. आपल्या राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत होता. पोलीसांना चकवा देण्यासाठी सांताक्रुज, गोरेगाव, माहीम, लालबाग, बदलापूर अशा अनेक ठिकाणी तो राहिला. वास्तव्याचे ठिकाण बदलत फिरत राहिला. अखेरीस तो रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीजवळील करंजणी या गावी जाऊन राहिला, अशी माहिती पोलीसांनी दिली. कोकणातील एका दुर्गम खेड्यात आपणाला कोणी पकडणार नाही, असे बहुधा, त्याला वाटले असावे.
फरार घोषित – यादरम्यान, आरोपी तारखांना हजर राहत नसल्याने कोर्टाने त्याला फरार घोषित केले. तसेच आरोपी राहत असलेली हाजी कासम चाळ तुटल्याने केवळ नावाशिवाय पोलीसांच्या हाती काहीच पुरावा नव्हता. त्यामुळे पोलिसांनी हळूहळू या प्रकरणाचा तपास बंद केला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला. मात्र आरोपीच्या नावाव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती काहीच नव्हतं. पंण पोलिसांनी हिंमत न हरता तंत्रज्ञानाची मदत घेत आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.
संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव – त्यासाठी पोलिसांनी निवडणूक आयोगाचं पोर्टल आणि आरटीओ विभागाच्या पोर्टलवर चंद्रशेखर म धुकर कालेकर हे नाव शोधलं. त्यातून चंद्रशेखर मधुकर कालेकर नावाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ एकच मतदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच चंद्रशेखर कालेकर ही व्यक्ती रत्नागिरीमधील दापोली येथे राहणारी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी थेट दापोली पोलीस ठाण्यात जात माहिती घेतली. तिथून या नावाच्या एका व्यक्तीवर २०१५ साली एक अपघाताचा गुन्हा नोंद असल्याचे कळले. तसेच आरटीओ ऑफिसमधून त्याचं लायसन आणि फोटो मिळाला.
काही आठवेना – या फोटोची शहानिशा केल्यानंतर पोलीस थेट आरोपीच्या घरी धडकले. एवढ्या वर्षांनंतर आपल्याला पोलीस पकडण्यासाठी येतील याची कल्पनाही नसल्याने पोलिसांना पाहून आरोपीला धक्काच बसला. तसेच ४८ वर्षांपूर्वी वयाच्या २३ व्या वर्षी केलेला गुन्हाही त्याला आठवेना, अखेरीस पोलिसांनी त्याने केलेल्या गुन्ह्याची सगळी माहिती त्याच्यासमोर ठेवली. तेव्हा आरोपीने गुन्हा कबूल केला. मग पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टासमोर हजर केलं असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन तावरे, पोलीस हवालदार कुलकर्णी, वैरागर, इंगवले आदींच्या पथकाने ४८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या.

