दिवाळी सणासुदीच्या या दिवसांत ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई मिळावी म्हणून अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे. अन्न व औषध विभागाने एकूण २० विशेष तपासण्या करून १६ अन्ननमुने मिठाई, खवा, खाद्यतेल, पनीर, पोहा, चिवडा, घेण्यात आले आहेत तसेच अन्नसुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात ३८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मिठाई तपासणीसाठी पथक नेमण्यात आले असून, हे पथक शहर व जिल्ह्यातील मिठाई दुकानात जाऊन अन्नाचे नमुने घेणार आहेत. मिठाईमध्ये भेसळ आढळल्यास दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सणासुदीच्या या कालावधीत प्रशासनाकडून १९६ अन्नपरवाने, तर ७७१ नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.
सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून मिठाई व इतर पदार्थ, दूध, खवा, मावा, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल, वनस्पती आदी मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या सणात ग्राहकांकडून बाजारपेठेतून खरेदी केली जाते. अन्नसुरक्षेविषयी कोणतीही घटना घडू नये, म्हणून तसेच अन्नसुरक्षेची तडजोड करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईची विशेष मोहीम सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा हाती घेतला आहे. सणासुदीत भेसळ होणार नाही, यासाठी दोन बैठका घेऊन व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. दिवाळी काही दिवसांवर असून, अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने मिठाई, खवा, तेलासह विविध खाद्यपदार्थांवर नजर असणार आहे. ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई मिळावी, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
टोल फ्री क्रमांकाचा वापर करा – अन्नपदार्थाच्या दर्जाविषयी कोणतीही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्र. १८००२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाचे नितीन मोहिते यांनी केले आहे.

