रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील संवादनिष्ठा यात्रेनिमित्त झालेल्या सभेत युवानेते आदित्य ठाकरे यांनी गद्दारी केलेल्या शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला. या यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेने विराट शक्तिप्रदर्शन केले. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘हा उत्साह पाहून मी खात्री देऊ शकतो की, ज्या ठिकाणी गद्दारी झाली, तेथे पुन्हा एकदा शिवसैनिकच जिंकून येणारच.
महिलांनी उद्धव ठाकरेंमध्ये विश्वासू माणूस आणि कुटुंबातील मुख्यमंत्री पाहिला, म्हणून मोठ्या संख्येने महिलावर्ग त्यांच्यामागे ठाम उभा आहे. जिथे स्थानिक आमदारांनी गद्दारी केली तेथे मला जनतेचा कौल पाहिजे. स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके, अशी या गद्दारांची स्थिती आहे. हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा. होऊन जाऊ दे, मग जनता तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवून देईल.
राज्यातून ‘वेदांत-फॉक्सकॉन’सह आणखी काही प्रकल्प गेले. कर्नाटक, गुजरात, तेलंगणमध्ये हे घडले असते, तर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता; परंतु तात्पुरत्या आणि डबल इंजिनच्या या सरकारला त्याचे काहीच गांभीर्य उरलेले दिसत नाही. आम्ही पुढे नेलेला महाराष्ट्र त्यांनी मागे खेचला. मुख्यमंत्री आधी दहीहंडीत व्यग्र होते, नंतर गणेशोत्सवामध्ये फिरले, आता नवरात्रोत्सवात व्यग्र असतील. त्यांना जनतेशी काही देणे-घेणेच दिसून येत नाही.
आता तरी त्यांनी राज्यातील ज्या मुख्य समस्या आहेत, जसे कि, प्रकल्प, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी याकडे लक्ष द्यावे असा हल्लाबोल शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजप आणि शिंदे सरकारवर केला. राज्याच्या उद्योगमंत्र्यांना राज्यातील उद्योगांची मंत्र्यांनाच माहिती नाही याची लाज वाटते. वेदांत-फॉक्सकॉन, बल्टपार्क यापैकी एकही प्रस्ताव आताच्या उद्योगमंत्र्यांना माहिती नाही. प्रकल्प गेल्याची कल्पना नसणे यासारखी दुर्दैवी बाब नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
या डबल इंजिन सरकारने केवळ आमच्याशीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राशी गद्दारी केली. तुम्ही कोणाबरोबर शिवसेना की खोके सरकारबरोबर, असे त्यांनी विचारताच कार्यकर्त्यांनी शिवसेनेबरोबर, असा हात वर करून शिवसेनेच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास दिला.