राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या तीन दिवसाच्या कोकण म्हणजेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या दौर्यामुळे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून सुमारे २५ कोटी ८१ लाखांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
ना. उदय सामंत यांनी मिळालेल्या निधीबाद्द्ल विस्तृतपणे सांगितले आहे. ते म्हणाले कि, ना. ठाकरे यांच्या दौर्यामुळे पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. सिंधुदुर्ग सहित रत्नागिरीमध्ये जिथे पर्यटन व्यवसाय तेजीने चालू शकतो तिथे पर्यटकांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
यामधील रत्नागिरीत म्युझिक शो उद्यानासाठी पाच कोटी, संगमेश्वर येथील संभाजी महाराज स्मारकासाठी पाच कोटी रुपये, मंडणगड येथील वेळास येथे कासव संरक्षण आणि महोत्सव पर्यटनाच्या दृष्टीने विकासासाठी दोन कोटी रुपये, केळशी याकूबबाबा दर्गा विकास २ कोटी रुपये, तारांगणासाठी व सायन्स गॅलरीसाठी १ कोटी ६३ लाख, दाभोळ चंडिकादेवी मंदिर १ कोटी ४० लाख, कालुस्ते बु. १ कोटी २९ लाख, आंजर्ले कडा गणपती १ कोटी २३ लाख, दुर्गादेवी दापोली मुरुड १ कोटी, रसाळगड १ कोटी, रत्नागिरी हातिस येथील दर्ग्याला १ कोटी रुपये, राजापुरातील अर्जुना नदी संगम विकास ४८ लाख, नाना फडणवीस ८५ लाख रुपये, केशवराज मंदिर ९० लाख रुपये निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहे. या उपलब्ध झालेल्या निधीमुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय विकसीत होणार असून कामाला एक प्रकारे गती मिळणार आहे, असे ना. सामंत म्हणाले.