मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा शाळेजवळील तीव्र उतारात वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. येथे रस्त्याच्या कडेला असलेली दोन झाडे तोडण्यात आली असून, रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. तसेच उतार कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही बाजूला ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आंदोलनानंतर तरी प्रशासन जागे झाले. महामार्गावरील हातखंबा येथील अवघड उतारावर सोमवारी नियंत्रण सुटलेल्या एलपीजी गॅस टँकरने चार दुचाकी व दोन टपरींचा चुराडा केला. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एलपीजी गॅस टँकर उलटून गॅसगळती झाली होती. वेळीच प्रशासनाने गॅसगळती रोखली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे तेथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत सोमवारी रास्तारोको केला होता.
ग्रामस्थांनी या वेळी रस्ता पूर्ण होईपर्यंत येथून होणारी अवजड वाहतूक थांबवावी, वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी, उतार कमी करावा अशा काही मागण्या केल्या होत्या तसेच ठेकेदाराला घटनास्थळी बोलावून घेण्याची मागणीही करण्यात आली होती. अखेर घटनास्थळी आलेल्या ठेकेदार व प्रशासनाकडून अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे मान्य केले. ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्याचप्रमाणे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, महामार्गाचे अधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेतली. या वेळी महामार्गावर होणाऱ्या अवजड वाहनांसंबंधी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते.
अपघाताची वाट पाहत होते का? – प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना सुरू केल्या. हातखंबा शाळेजवळ असणारे झाड तोडण्यात आले. तेथून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले तसेच तीव्र उतार कमी करण्यासाठी भराव टाकून उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. आता उपाय सुरू झाले मग प्रशासन या ठिकाणी अपघात होण्याची वाट पाहत होतं का, असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
असे आहेत उपाय – उतारातील झाडे तोडली, अपघाती वळणाचे रुंदीकरण, वाहतूक नियंत्रणार्थ कर्मचारी