शुक्रवारी चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय विश्वचषक सामना रंगला. या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव केला. हा सामना पाकिस्तानसाठी करा किंवा मरो असा होता. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. सामना गमावल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंची चांगलीच निराशा झाली. त्याचवेळी बाबर आझम आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर चांगलाच संतापलेला दिसत होता.
शाहीन आफ्रिदीचा व्हिडिओ – एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील पाकिस्तानचा हा सलग चौथा पराभव आहे. 2011 पासून त्यांचा संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकलेला नाही. 12 वर्षे उपांत्य फेरी गाठू न शकल्यामुळे यंदा पाकिस्तानी खेळाडूंवर खूप दडपण होते. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी डगआउटमध्ये बसलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शाहीन रडत असल्याचे दिसत आहे. लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे शाहीन रडत असल्याचा दावा करत आहेत.
हा व्हिडिओ या ODI विश्वचषकाचा आहे कारण शाहीनने घातलेली जर्सी या हंगामातील आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये किती तथ्य आहे हे सांगणे कठीण आहे. कारण अनेकदा खेळाडू ओव्हर टाकल्यानंतर थकतात आणि काही वेळ डगआऊटमध्ये बसतात. कदाचित शाहीन आफ्रिदी देखील असेच काही करत असेल, कारण व्हिडीओमध्ये शाहीन रडत आहे की थकव्यामुळे श्वासोच्छवास वाढला आहे हे स्पष्टपणे दिसत नाही. अशा परिस्थितीत या व्हिडिओबद्दल आत्ताच काही बोलणे चुकीचे ठरेल.
पाकिस्तानचा दारुण पराभव झाला – पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 46.4 षटकांत 270 धावांवर सर्वबाद झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने या लक्ष्याचा पाठलाग करताना 47.2 षटकांत 9 गडी गमावून 271 धावा केल्या.