भारताची हरनाज संधू हिने २१ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मिस युनिव्हर्स खिताबावर नाव कोरले आहे. २१ वर्षांनंतर एका भारतीय सौंदर्यवतीला हा खिताब प्राप्त झाला आहे. २००० साली लारा दत्ता मिस युनिव्हर्स बनली होती. तेव्हापासून भारताला या विजेते पदाची प्रतीक्षा होती. ७० वी मिस युनिव्हर्स स्पर्धा १२ डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये झाली. यामध्ये हरनाजने ७९ देशांच्या सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला.
अलीकडेच हरनाज संधूने ‘मिस दिवा मिस युनिव्हर्स इंडिया २०२१ चा खिताब जिंकलेला. तेव्हापासून तिने मिस युनिव्हर्स २०२१ चा ताज जिंकण्यासाठी अतोनात मेहनत करायला सुरुवात केली होती. जाणून घेऊया हरनाजच्या काही विशेष गोष्टी थोडक्यात.
हरनाज संधू हि पंजाबी कुटुंबातील असून ती चंदीगड येथील रहिवासी असून, मॉडेलिंग क्षेत्रामध्ये टी काम करते आहे. तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिवालिक पब्लिक स्कूल, चंदीगड येथून पूर्ण झाले. चंदीगडमधून ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर ती सध्या मास्टर्स पूर्ण करत आहे. अवघ्या २१ वर्षांची हरनाझ मॉडेलिंग आणि अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले नाव कमावलेच आणि स्पर्धा जिंकल्यानंतरही तिने तिच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही.
२०१७ साली तिने कॉलेजमध्ये एका शो दरम्यान आपला पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला. त्यानंतर हा मॉडलिंगचा प्रवास सुरू झाला. तिला पोहणे, अभिनय, नृत्य, घोडेस्वारी आणि प्रवासाची खूप आवड आहे. तीच्या मोकळ्या वेळामध्ये ती हे छंद पूर्ण करते. भविष्यात संधी मिळाली तर तिला चित्रपटातही काम करण्याची इच्छा आहे.