25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriरत्नागिरी आगारची एसटी सेवा कोलमडली…

रत्नागिरी आगारची एसटी सेवा कोलमडली…

डिझेलच न मिळाल्याने सकाळपासूनच्या सुमारे १५०च्या वर फेऱ्या रद्द झाल्या.

एसटीच्या पेट्रोलपंपामध्ये बिघाड असल्यामुळे सोमवारी सकाळपासून फेऱ्यांवर मोठा परिणाम झाला. डिझेल तुटवडधामुळे सुमारे १५० च्या वर फेऱ्या रद्द झाल्याने एसटीची सेवा पूर्ण कोलमडली. यात प्रवाशांचे नाहक हाल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पंपाची दुरुस्ती झाली नव्हती; परंतु याची नेमकी वस्तुस्थिती सांगण्यास एसटीच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली, आगार व्यवस्थापकांनाही एसटीच्या किती फेऱ्या रद्द झाल्या, हे माहिती नाही, हे दुर्दैव, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. एसटी प्रवास म्हटलं की, नाक मुरडणारे प्रवासी आता शासनाच्या विविध योजनांमुळे एसटीला अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे एसटी विभागाला सध्या सुगीचे दिवस आहेत.

शासनाने महिलांना तिकिटात पन्नास टक्के सवलत दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या अनेक योजना सुरू आहेत. शाळा सुरू असल्याने त्या फेऱ्या देखील सुरू आहेत. शहरी, ग्रामीण फेऱ्या अचानक रद्द झाल्यामुळे एसटीचे वेळापत्रक पुरते कोलमडले. रत्नागिरी आगारातून सुटणाऱ्या एसटी गाड्यांमध्ये सकाळी एसटीच्या पंपावर डिझेल भरून फेऱ्या सोडल्या जातात. डिझेल साठा संपल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून देवरूख आगारातून डिझेल मागवण्यात आले होते. देवरूखहून मागवलेले डिझेल पंपात टाकले. गाड्यांमध्ये भरण्यास सुरुवात केली असता एररमुळे ते भरता आले नाही, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सागितले.

डिझेलच न मिळाल्याने सकाळपासूनच्या सुमारे १५०च्या वर फेऱ्या रद्द झाल्या. यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. नेमका डिझेल तुटवडा झाला की, पंपाला एरर आला, याबाबत माहिती विचारण्यासाठी संपर्क साधला; परंतु या गोंधळामुळे किती फेऱ्या रद्द झाल्या, हे सांगण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. दरम्यान, एसटीने ऑइल कंपन्यांकडूनही डिझेल टँकरची मागणी केली आहे. तो टँकर वाटेत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत टँकर आला नव्हता. यावरून आगारात डिझेल तुटवडा असल्याचे स्पष्ट आहे; परंतु अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देण्यास चालढकल केली.

RELATED ARTICLES

Most Popular