सातत्याने पडणारा पाऊस आणि वातावरणामध्ये झालेल्या बदलांमुळे गेल्या काही दिवसांपासून तापसरीसह डेंगीच्या साथीने तालुक्यात डोके वर काढले आहे. डेंगीसह तापसरीच्या साथींना अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागाकडून कंबर कसली जात आहे. घरोघरी असलेल्या कंटेनरची आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून, त्यामध्ये १ लाख १२ हजार ८८६ कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६७४ कंटेनर दूषित आढळले असून, योग्य त्या उपाययोजना आणि कार्यवाही करून नष्ट करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिली.
शहरासह डेंगीचे रुग्ण आढळून आलेल्या गावांमध्ये धूरफवारणीही करण्यात आल्याची या वेळी स्पष्ट करण्यात आले. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये डेंगीचे २५ रुग्ण आजपर्यंत आढळून आले. त्यापैकी २४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून कार्यरत असलेल्या एका रुग्णाची तब्येत सध्या बरी असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. बदललेल्या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम होऊन तापसरी, डेंगीसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे.
तापसरीची साथ आणि डेंगीचे रुग्ण आढळून आल्याने रोगांचा फैलाव रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये घरोघरी भेटी देऊन विविध प्रकारची तपासणीही करण्यात येत आहेत. त्याचवेळी लोकांशी संवाद साधून डेंगीसह अन्य सार्थीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, कोणत्या उपाययोजना व्हाव्यात, या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.