जिल्हा रुग्णालयातील विविध समस्येसंदर्भात आमदार राजन साळवी यांनी आज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेतली. भूलतज्ज्ञाविना रुग्णांची फरफट होत आहे. बुधवारी (ता. ३) दिवसभरात जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ हजर न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिकारात अधिकृतपणे गेले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत आमदार राजन साळवी यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली.
मागील काही दिवस जिल्हा रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. अनेक दिवस झाले रुग्णालयात भूलतज्ज्ञांची कमतरता आहे. त्यामुळे रुणावरील शस्त्रक्रियेला होणाऱ्या विलंबामुळे रुग्णाचे प्रचंड हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंके, उपशहरप्रमुख महेश पत्की, श्रीकृष्ण चव्हाण उपस्थित होते.