वाशिष्ठी- दाभोळ खाडीपट्ट्यात पावसाळ्यामध्ये वाळू उत्खनन करण्यास बंदी असतानाही रात्री ड्रेझरने वाळू काढली जात आहे. रात्री बारा वाजल्यानंतर पहाटेपर्यंत वाशिष्ठी खाडीत वाळू उत्खननाचा रात्रीस खेळ सुरू आहे. असा आरोप मच्छीमार संघर्ष समितीने केला आहे. शासकीय आदेश झुगारून खाडीत रात्रीच्यावेळी थेट ड्रेझरने वाळू उत्खनन केले जाते. शिरळ, दिवा बेट आणि वाशिष्ठी-जगबुडीच्या संगमाजवळ मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. प्लास्टीकच्या बोटीतून ही वाळू काढून बार्ज भरले जातात आणि हे बार्ज अन्य तालुक्यात पाठवतात. या वाळूमध्ये मोठे अर्थकारण दडले आहे.
या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. रात्री १२ नंतर वाशिष्ठी खाडीत दररोज सक्शन पंप धडधडू लागले आहेत. याचा त्रास दाभोळ- वाशिष्ठी खाडीतील मच्छीमारांनाही होतो. या संदर्भात दाभोळ खाडी संघर्ष समितीचे संजय जुवळे यांनी सलग दोन दिवस वाशिष्ठी खाडीमध्ये रात्री पदाधिकाऱ्यांसमवेत लक्ष ठेवले. मात्र रात्री १२ नंतर ते घरी परतल्यावर पुन्हा रात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास सक्शन पंप खाडीत धडधडू लागले. पहाटेपूर्वी ही वाळू जागेवरून गायब केली गेली. याबाबत संघर्ष समिती प्रशासनाला निवेदन देणार आहे.
बड्या लोकप्रतिनीधींकडे धाव – चिपळूण तालुक्यातील अनधिकृत वाळूचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. मध्यंतरी महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर संबंधित वाळू व्यावसायिकांनी बड्या लोकप्रतिनीधींकडे धाव घेतली होती. मध्यस्थी करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा सक्शन पंपाद्वारे अनधिकृत वाळू उत्खनन सुरू झाले आहे. याबाबत महसूलचे अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे मच्छीमार समाजाचे लक्ष लागलेले आहे.