पंतप्रधान नरेंद्र मोदी गतिमान विकास आणि लोककल्याकारी योजना राबवत देश प्रगतीपथावर नेत आहेत. त्याचं धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकार राज्यात आदर्शवत असे काम करत आहेत. हे जनतेचे सरकार आहे. आगामी निवडणुकीत जनतेच्या मोठ्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार विजयी होईल. सोबतच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्यातून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केला. दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी विरोधकांचा समाचार घेतला, विरोधकांचे विकासात योगदान काय?, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात शाळा तरी सुरु केली काय ? मुख्यमंत्री असताना कोरोना काळात औषध खरेदीत कमिशन खाणारे हे लोकं आहेत. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवार करू शकले नाहीत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखविले. लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचली.
अनेक योजना या सरकारने आणल्या. त्यामुळे विरोधकांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करूया. कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला सर्व जागा जिंकून अबाधित ठेऊया, असेही आवाहन खा. राणे यांनी केले. कुडाळ मालवण विधानसभा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा मालवण कुंभारमाठ येथील अथर्व सभागृहात पार पडला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, बाळू नाटेकर, मधुकर चव्हाण, राजेश हाटले यासह शिवसेना, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांच्या मोठ्या मताधिक्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी खासदार नारायण राणे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मोफत धान्य दिले, उपचारासाठी पाच लाखापर्यंत खर्च आयुष्यमान योजनेतून होणार आहे, पंतप्रधान आवास योजनेतून बारा कोटी घरे उभारून दिली.
अकरा कोटी कुटुंबाना नळपाणी योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्यात आले. त्याच धर्तीवर महायुती सरकार अनेक जनहिताच्या योजना राबवत आहे. शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, तरुण वर्ग यासह सर्व घटकांसाठी हे सरकार तत्पर आहे. सोबतच विकासाचा आलेख गतिमान राहिला आहे. महायुती सरकार पुन्हा यावे, विकासाची गती कायम रहावी, हा जनतेचा निर्धार आहे. त्यामुळे जनतेच्या पाठिंब्यावर हे सरकार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असे खासदार राणे म्हणाले.
अपप्रचाराला महायुतीचे कार्यकर्ते बळी पडणार नाहीत : येणाऱ्या काही दिवसात विरोधकांकडून अपप्रचार केला जाईल, अफवा पसरवल्या जातील, मात्र महायुतीचे कार्यकर्ते आजपर्यंत कोणत्याही अफवांना बळी पडले नाही आणि पडणारही नाहीत. २३ तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्गातून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, सर्वत्र विजयी रॅली निघेल, असे निलेश राणे यांनी सांगितले.