रत्नागिरीचे रस्ते, गटारे, पाणी व्यवस्थापन हे सगळीकडेच चर्चेत आहे. अनेक वर्षे रेंगाळलेले रस्त्याचे खोदकाम अजून जैसे थे च आहे. मागील आठवड्यात अचानक आलेल्या अर्ध्या तासाच्या पावसाने राम आळी “जाम” झाली होती. बाजारपेठ भागामध्ये गुडघाभर पाणी साचले होते. त्यातच गटारे ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने त्याच घाणीच्या पाण्यातून जनतेला मार्ग काढत जावे लागत होते.
अनेक व्यापार्यांच्या दुकानामध्ये सुद्धा पाणी घुसले. गटारे वेळोवेळी साफ केली नसल्याने, अशी अवस्था निर्माण झाली असल्याचे सामान्य जनतेमधून बोलले जात आहे. लहान विक्रेते, व्यापारी यांची पावसाच्या पाण्याच्या भीतीने सामानाची हलवाहलव करताना एक प्रकारे तारांबळच उडाली.
काही दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रामआळी, मारुती आळी, गोखले नाका परिसरामध्ये गुडघ्यापर्यंत येईल एवढे पाणी तुंबले होते. याची गंभीर दखल घेऊन नगर परिषदेने त्या ठिकाणची गटारे साफसफाई व नवीन गटारांची मोहीम सुरू केली होती.
त्यावेळी अनेक ठिकाणी गटारांवर अनधिकृत पण पक्के बांधकामे करण्यात आली आहेत. अनेक दुकानदारांनी गटारावर पक्के बांधकाम केल्याने नित्याने गटारांची साफसफाई होत नव्हती. याचठिकाणी असणाऱ्या एका गटारावर एका इमारतीचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. काही ठिकाणी रस्त्याच्या जागेमध्येच बोरिंग देखील मारण्यात आल्याचे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
सामान्य जनतेला होणारा त्रास लक्षात घेता, गटारे साफ करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत ती त्वरित हटवण्याच्या सूचना नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि आरोग्यसभापती निमेश नायर यांनी अतिक्रमण विभागाला दिल्या आहेत. यानुसार तत्काळ जेसीबी नेऊन या अनधिकृत बांधकामावर जेसीबी चालवण्यात आला आहे.