शहा म्हणाले, “रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदासंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्या रुपाने एक चांगला चेहरा दिला आहे. याच राणेंनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले अनेक दिवस संघर्ष केला आहे. राणे यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. त्यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीत विश्वकर्मा योजनेमधून विकासकामे केली आहेत. कोकणचा विकास करण्याचे काम राणे निश्चितपणे करतील. रत्नागिरी-सिंधुदुर्गती लोकांनी त्यांच्या पाठीशी राहावे.” काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांनी ३७० हटवण्यासाठी विरोध केला.
काश्मीरच्या लाल चौकात जाणे अवघड होते, आज तिथे कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. आज उद्धवजींना विचारू इच्छितो की, तुम्हाला मुख्यमंत्रिपद हवे आहे की कलम ३७० हटवणाऱ्याला विरोध करणारी काँग्रेस-राष्ट्रवादी पाहिजे. १० वर्षात सोनिया-मनमोहन यांची सत्ता होती. पाकिस्तानी लोक देशात घुसत होते. मनमोहन सिंग मौन राखत दिल्लीत बसले होते. त्यांना व्होट बँकेची चिंता होती. त्यांची व्होट बँक कोण आहे हे सर्वांना माहिती आहेच. काँग्रेसची व्होट बँक उद्धव ठाकरेंची झाली आहे, असा आरोप शहा यांनी केला.
मुख्यमंत्री होण्यासाठीच ठाकरे यांनी काँग्रेस, शरद पवारांशी हातमिळवणी केली. देशाच्या काँग्रेसने राम मंदिराचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवून त्यावर मतांचे राजकारण केले. दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या मोदींनी सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराची केस जिंकून मंदिराची पायाभरणी करत उभारणीही केली. त्यानंतर राम प्रतिष्ठापना सोहळा अख्ख्या जगाने पाहिला. राम मंदिर उभारण्याची हिंमत फक्त मोदीच करू शकतात. आपल्याला अनेक वर्षांत जे जमले नाही, ते मोदी करत असताना केवळ विरोध करण्याचे काम राहुल गांधी व शरद पवार करीत आहेत.
दुर्दैवाने त्यांच्या चरणावर उद्धव ठाकरे जाऊन बसले आहेत, अशी टीका केली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री उदय सामंत, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार शेखर निकम, आमदार नीतेश राणे, आनंदराव अडसूळ, नीलेश राणे, चित्रा वाघ, किरण सामंत, बाळासाहेब माने यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते. राणे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
ही शिवसेना नकली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवाद्यांचा बीमोड, राम मंदिराची निर्मिती, ३७० वे कलम रद्द आणि देशाची सुरक्षेचे कार्य केले. असे असताना सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणे पसंत केले. अशी व्यक्ती महाराष्ट्राचा गौरव राखू शकत नाही. तिहेरी तलाक, समान नागरी कायदा, मुस्लिम पर्सनल लॉ यासह स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यांवर ते भूमिका घेऊ शकत नाहीत. ही शिवसेना नकली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला असला तरी बाळासाहेबांचा वारसा एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि नारायण राणे चालवत आहेत, असे शहा यांनी सांगितले.
जगात तिसरा क्रमांक मिळवू – गेली अनेक वर्षे या देशाचे नेतृत्व काँग्रेसकडे होते. अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते. तरीही देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर येऊन थांबली. मात्र, दोनवेळा देशाचे पंतप्रधान झालेल्या मोदींनी अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आणली. तिसऱ्यांदा संघी मिळाली तर जगात तिसरा क्रमांक मिळवू. ही जबाबदारी तुम्हा सगळ्यांवर आहे, असे शहा म्हणाले.
आघाडीची उडवली खिल्ली – इंडिया आघाडीची खिल्ली उडवताना ते म्हणाले, “इंडिया आघाडी चुकून सत्तेत आली, तर त्यांच्याकडे पंतप्रधानपदासाठीचा चेहराच नाही. यावर त्यांना कुणीतरी विचारले असता आम्ही एक-एक वर्षे वाटून घेऊ असे सांगितले. ही परिस्थिती असेल तर इंडिया आघाडी देशाचे नेतृत्व कसे करणार, असा प्रश्नही उपस्थित केला.