साडेतीनशे वर्षांपूर्वी याच संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी राजे यांच्या बरोबर गद्दारी झाली, ती जखम अजून भळभळतेय… त्या वेदना अजून होत आहेत,… पण शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे कसे हे शंभूराजे शिकवून गेलेत,… पुन्हा गद्दारी झालीय,… पण हा कडक पाषाणाचा सह्याद्री आहे. येथे गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. यावेळी गद्दारांच्या छाताडावर भगवा फडकवण्यासाठी आलोय, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी तुफान डायलॉगबाजी करत चिपळूण येथील सभा अक्षरशः गाजविली. ही महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे हे लक्षात ठेवून मतदान करा, आणि प्रशांत यादव यांना विजयी करा, विजयी मिरवणुकीला मी स्वतः येतो असे ते म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे स्टार प्रचारक तथा अभिनेते खासदार अमोल कोल्हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी शनिवारी चिपळूणमध्ये आले होते.
त्यांच्या उपस्थितीत चिपळूण बहादूरशेख येथील सावरकर मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री रवींद्र मांने, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार रमेशभाई कदम, राष्ट्रवादीचे निरीक्षक बबन कनावजे, रहिमान शेख, शिवसेनेचे राजेंद्र महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तसेच रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सभेसाठी मैदान जणू कमी पडले इतकी तुफान गर्दी उसळली होती. पुन्हा एकदा गर्दीचा उच्चांक या मैदानात पाहण्यास मिळाला.
यावेळी सुनामी आलीय – खासदार अमोल कोल्हे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत म हाराष्ट्रात उद्धवजी ‘ठाकरे आणि शरद पवारसाहेबांचे वादळ आले असे सांगितले जात होते. परंतु यावेळी वादळ नव्हे तर चक्क सुनामी आलेली आहे. या सुनामीत गद्दारांचा पाळापाचोळा नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. येथून जरा गुहागर ला जाण्याची इच्छा होती. पण पुढे आणखी चार सभा आहेत. त्यामुळे वेळ मिळत नाहीये, अन्यथा तिथे देखील जरा खळबळ उडवून आलो असतो. असेही ते म्हणालें.
शिवसैनिक पेटलाय – मी शिवसेनेत काम केलंय, त्यामुळे मला चांगले माहीत आहे. शिवसैनिक सहजासहजी पेटत नाही. पण एकदा का पेटला की मग त्याला शांत करणे कोणालाही शक्य नाही. तो अंगार आहे. आणि आता मी पूर्ण महाराष्ट्रात बघतोय तेच चित्र चिपळूणमध्ये ही बघतोय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला जी वागणूक दिली गेली ती शिवसैनिकांना पेटवणारी ठरली आहे. शिवसैनिक संतापला आहे. पक्षप्रमुखांच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी तो तडफडतो आहे. त्यामुळे समोरच्यांनी आता सावध रहावे, असे अमोल कोल्हे यांनी म्हणताच गर्दीतून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि संपूर्ण परिसर दणाणून गेला.
रातोरात पळून जाता? – अमोल कोल्हे आज चांगलेच आक्रमक दिसत होते. ते म्हणाले उद्धवजी ठाकरे गंभीर आजारात पडलेले असताना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याऐवजी रातोरात पळून गेले. पुढे त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले, पक्ष आणि चिन्हे चोरले. अरे पाठीमागून कसलें वार करता,.? अरे समोरासमोर मैदानात लढायचे होते ना…! रक्त आटवून, घाम गाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला पक्ष एका रात्रीत पळवता. ? शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.
गुलाबी रंगामागे गद्दारीचा डाग – चिपळूणमध्ये गुलाबी रंगांची यात्रा आली होती म्हणे, तुम्ही बघितला का गुलाबी रंग..? निरखून बिघितलं का.? काय, काय दिसलं….. अशी जोरदार टोलेबाजी करत खासदार अमोल कोल्हे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अहो त्या गुलाबी रंगामागे गद्दारीचा डाग आहे. तो कदापि पुसला जाणार नाही. पितृतुल्य पवार साहेबांना या वयात तुम्ही दगा दिला..! एका रात्रीत पळून गेले. आणि म्हणाले आम्ही विकासासाठी गेलो, अरे कसला विकास केलात.? अडीच वर्षे खा-खा खाऊन निवडणुकीच्या तोंडावर दोन दिवसात तब्बल अडीचशे जीआर काढले. हा विकास का.? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ते मुख्यमंत्री होणारच नाहीत – अमोल कोल्हे यांनी आज देवेन्द्र फडणवीस यांचा देखील खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले देवेन्द्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. ते शंभर टक्के खरे आहे. कारण मुख्यमंत्री होण्यासाठी सरकार येणे गरजेचे आहे. आणि देवेन्द्र फडणवीस यांना समजले आहे की आता महायुतीचे सरकार येणार नाही. त्यामुळे त्यांनी अगोदरच माघार घेऊन हात वर केले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येणार हे आता देवेन्द्र फडणवीस यांनीच एक प्रकारे मान्य केले आहे. त्यामुळे मी पुन्हा दोन पक्ष फोडून आलो, असे म्हणण्याचे धाडस ते अजिबात करणार नाहीत. नियतीनेच त्यांचा खेळ संपवला आहे. आशा शब्दात त्यांनी देवेन्द्र फडणवीस यांच्या थेट समाचार घेतला.
महागाईवर का बोलत नाही – जोरदार शेरोशायरी करत अमोल कोल्हे म्हणाले १५ लाख की बात सिर्फ १५०० पर आकर अटक गयी, क्यू,? अरे आधी महागाईवर बोला. बाळा च्या जन्मापासून ते अगदी माणसाच्या मृत्यू पर्यंत सर्वांवर जीएसटी लावली. ५ टक्के पासून थेट २८ टक्के पर्यंत जीएसटी वसूल केली जात आहे. गोडेतेलाचे भाव काय झाले, ? पेट्रोल, डिझेल कोणत्या दराने मिळतेय,. ? डाळीचे भाव काय..? आणि माझ्या माय भगिनींना १५०० रुपये देऊन थट्टा करताय का.? म्हणजे आमच्याच खिशातून काढायचे आणि आम्हालाच द्यायचे वरती उपकार केले सारखे, बॅनर लावायचे. आणि मिळाले ना, मिळाले ना म्हणत बोंब ठोकायची, ही नाटके बंद करा, आमच्या भगिनी सर्व ओळखून आहेत. असेही ते म्हणाले.
प्रशांत यादव आमदार – खासदार अमोल कोल्हे शेवटी म्हणाले येथील चित्र बघितल्यानंतर मला खात्री पटली आता प्रशांत यादव आमदार झालेलेच आहेत. पण २० तारखेला मतदान यंत्रापर्यंत हा लोंढा पोहचवा आणि तुतारी वाजवणारा म ाणूस या चिन्ह समोरील १ नंबर चे बटन दाबून प्रशांत यादव यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत दिमाखात पाठवा, असे आवाहन करतानाच कसबा येथील सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभे करण्यासाठी पहिला प्रश्न विधानसभेत मांडून तुमच्या कामाची सुरुवात करा, असे स्मारक उभे करा की भविष्यात या मातीत गद्दारी करण्याची हिंमत कोण करणार नाही. असे भारदस्त संवाद फेकीत नमूद करत त्यांनी रजा घेतली.