कोकणातील जनता ही फणसासारखी आहे, वरून काटेरी असली तरी आतून गोड आहेत. बाळासाहेबांवर प्रेम करणारी आहे. कोकण आणि शिवसेना हे येथील समिकरणच आहे, येथील जनता ही विरोधकांचा वेळीच करेक्ट कार्यक्रम करेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दापोलीच्या जाहीर सभेदरम्यान व्यक्त केला. ज्यांनी बाळासाहेबांशी बेईमानी केली त्यांना कोकणी जनता कधीच थारा देणार नाही, असा हल्लाबोल करतानाच ‘तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला नामदार देतो’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच ‘एकच वादा, योगेश दादा’, ‘योगेश दादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा देत शिवसैनिकांनी मैदान दणाणून सोडले. महायुतीचे दापोली मतदार संघाचे उमेदवार आम. योगेश कदम यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आझाद मैदानावर झाली. यावेळी खा. सुनील तटकरे, माजी मंत्री रामदासभाई कदम, आरपीआयचे दादा मर्चडे, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आम. सूर्यकांत दळवी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणी जनतेचे कौतुक – यावेळी बोलताना मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी कोकणी जनतेचे तोंड भरून कौतुक केले. कोणी कितीही, काही केले तरी कोकण आणि शिवसेना हे अतूट नाते कोणी वेगळे करू शकणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
करेक्ट कार्यक्रम – परवा याच ठिकाणी एका युवराजाने इथे येऊन बर्फाच्या लादीवर झोपवण्याची भाषा केली. मात्र योगेश कदम हा शांत, संयमी आमदार तसेच निष्ठावंत कार्यकर्ता आहे. तो कधी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करून जाईल हे विरोधकानाही कळणार नसल्याचे सांगत येथील तरुणांच्या हाताला काम मिळावे, सोबतच या परिसरात उद्योगधंदे यावेत यासाठी योगेश कदम हे प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीचे सरकार येईल – दापोली मतदारसंघाची निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर आहे. महायुतीच्या सरकारने येथील आमदार योगेश कदम यांना साडेतीन हजार कोटी पेक्षा जास्त निधी दिला आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली ज्यांनी धनुष्यबाण गहाण ठेवला अशांना कोकणातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत तुमच्या लाडक्या आमदार योगेशदादाला येत्या निवडणुकीत प्रचंड मताधिकाने आमदार बनवा मी त्यांना नामदार केल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.