शहरात घडलेल्या चार प्रसंगाशी माझा काही संबंध नसताना माझे राजकीय करिअर धोक्यात आणण्यासाठी मला नाहक गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोवंश हत्या, मुलीवर झालेला अत्याचार, वक्फ बोर्ड आणि संघाचे संचलन प्रकरण यामध्ये मला लक्ष्य करून माझ्याबाबत हिंदू धर्मीयात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझा मोबाईलचा सीडीआर तपासून पाहावा. कोणाला पाठीशी घातल्याचे उघड झाले तर मी स्वतः थांबायला तयार आहे; परंतु यामागचा सूत्रधार शोधावा, अशी भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बोललो आहे. त्यांनी एसआयटी बसवून याची चौकशी करावी.
रत्नागिरी एमआयडीसी परिसरामध्ये गोवंश हत्याप्रकरण उघड झाले. त्यामध्ये जो कोणी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा, अशा सूचना पोलिसांना दिल्या होत्या. या घटनेनंतर मी शांत बसलेलो नाही. शंकराचार्यांना भेटलो आणि गोमातेला राष्ट्रमाता करावी, अशी मागणी केली तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींना भेटून राज्याची भूमिका स्पष्ट करायला सांगितली. आज मला अभिमान आहे की, गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यास यश आले. चंपक मैदानात एका तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी याबाबत यापूर्वीच खुलासा करणे आवश्यक होते. त्याबाबतचा अहवाल माझ्याकडे आहे. मी तो देऊ शकत नाही. पोलिसांनी तो पुढे आणला तर अनेकांचे डोळे उघडतील.
वफ्क बोर्डाबाबतही गैरसमज पसरवण्यात येत आहे. ते वफ्क बोर्ड मी मंजूर केलेले नाही. मंत्री अब्दुल सत्तार यांनी ते मंजूर केले होते. त्याचे कार्यालय तेव्हापासून सुरू आहे. आता कार्यालयांतर्गत दुरुस्ती करून त्याचे उद्घाटन मी केले. शंका असेल तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटू असे सामंत यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनावेळी झालेल्या प्रकाराबाबत नाव न घेता मला लक्ष्य केले जात आहे. यामध्ये लाठीचार्जचा आदेश कोणी दिला, त्याची चौकशी कराच. या प्रकरणात माझ्याजवळच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत मी बशीर मुर्तुझा, राजेश सावंत यांच्याशीही बोललो आहे. पालकमंत्री म्हणून हस्तक्षेप केला नाही असे सामंत यांनी सांगितले. या वेळी राहुल पंडित, बाबू म्हाप, बिपिन बंदरकर, आबा घोसाळे, दीपक पवार उपस्थित होते.