26.1 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

जिल्ह्यात सहा लाखांचा अवैध मद्य साठा जप्त…

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रत्नागिरी विभाग व...

प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण, बंदोबस्त तैनात

अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देत जड...

राजापूर प्रारूप प्रभाग रचनेवर ८३ हरकती

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या नगर पालिका निवडणुकीचे...
HomeRajapurअणसुरे गावाच्या कार्याची केंद्र शासनाने घेतली दखल, पंतप्रधान उद्या साधणार संवाद

अणसुरे गावाच्या कार्याची केंद्र शासनाने घेतली दखल, पंतप्रधान उद्या साधणार संवाद

घरोघरी तयार होणाऱ्‍या कचरा आणि सांडपाण्याचे योग्य पद्धतीने संकलन आणि विघटनासाठी माझी वसुंधरा उपक्रमांतर्गंत घरोघरी शोषखड्डे बांधण्यात आले आहेत.

अणसुरे ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा’, ‘स्वच्छ भारत मिशन’ आदी शासनाची महत्त्वाकांक्षी अभियाने गावामध्ये राबविली आहेत. त्याला ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावामध्ये निर्माण होणारा कचरा आणि सांडपाण्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने गावामध्ये शंभरहून अधिक वैयक्तिक आणि सामुदायिक स्वरूपाचे शोषखड्डे मारण्यात आले आहेत.

माझी वसुंधरा उपक्रमांतर्गंत गावच्या सर्वांगीण विकासासह पर्यावरण जतन आणि संवधर्नाच्या दृष्टीने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्‍या तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायतीने स्वच्छ आणि सुंदर गाव राहण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. घरोघरी तयार होणाऱ्‍या कचरा आणि सांडपाण्याचे योग्य पद्धतीने संकलन आणि विघटनासाठी माझी वसुंधरा उपक्रमांतर्गंत घरोघरी शोषखड्डे बांधण्यात आले आहेत. ज्या कुटुंबीयांकडे जागा उपलब्ध नाही, त्यांनी सामुदायिकरीत्या शोषखड्डे बांधले आहेत. आजपर्यंत गावामध्ये शंभरहून अधिक शोषखड्डे बांधण्यात आले असून, त्यातून कचरा आणि सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात असून, लोकांच्या हाताला काम अन् बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

माझी वसुंधरासह स्वच्छ भारत मिशनअंतर्गंत कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासह अन्य राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, पर्यावरण जनजागृती आणि संवर्धनाच्यादृष्टीने गावच्या जैवविविधततेची वेबसाईट बनविणारी देशातील पहिली ग्रामपंचायत म्हणून अणसुरे गावाची केंद्र शासनाने दखल घेतली आहे. या उपक्रमांच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दि. ३१ मे रोजी अणसुरेचे सरपंच रामचंद्र कणेरी आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत यांच्याशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.

ग्रामविकास अधिकारी श्री. राऊत यांनी दीडशेहून अधिक शोषखड्डे प्रस्तावित असल्याची माहिती दिली. सांडपाणी आणि कचऱ्‍याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्डे मारण्यासाठी लागणारे माणसेही गावातीलच असल्याने त्यांना रोजगारही प्राप्त झाला. घरोघरी आणि सामुदायिकरित्या बांधण्यात आलेल्या शोषखड्ड्यांमुळे घरोघरी निर्माण होणारा कचरा आणि सांडपाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे शक्य झाले आहे.

आता पर्यावरणाला घातक ठरणाऱ्‍या प्लास्टिकचे संकलन करण्यासाठीही अणसुरे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी माझी वसुंधरा उपक्रमांतर्गंत गावामध्ये प्लास्टिक संकलन शेड उभारण्यात आली आहे. या शेडच्या माध्यमातून गावामध्ये निर्माण होणाऱ्‍या प्लास्टिकचे संकलन करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular