शहरातील मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. पालिकेने तत्काळ यावर उपाययोजना करून गुरे आणि कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करावे. पकडलेली गुरे कोंडवाड्यात ठेवून त्यांच्या मालकांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही गुरे पालिकेत आणून बांधू, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला. शहरातील विविध प्रश्नांसाठी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आज पालिकेवर धडकले. शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, विभागप्रमुख शेखर घोसाळे, प्रसाद सावंत, महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते. शहरामध्ये मोकाट गुरांचा गंभीर प्रश्न आहे.
एक संस्थेने केलेल्या सर्व्हेमुळे सुमारे अडिचशे मोकाट गुरे असल्याचे पुढे आले आहे. ही गुरे कळपाने शहरात मुख्य रस्त्यावर फिरतात किंवा ठाण मांडतात. यामुळे वाहतूककोंडी होते तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड आहे. झुंडीने ही कुत्री शहरात फिरताना दिसतात. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गुरे पकडून कोंडवाड्यात तीन दिवसासाठी ठेवू शकतो. त्यानंतर त्याचा लिलाव करणे हे नगरपालिका कायद्यामध्ये आहे. आम्ही त्यांचे पालनपोषण करू शकत नाही. काही खासगी गोशाळा व संस्थांशी आम्ही संपर्क साधला आहे. उद्यापासूनच टॅग लावलेली गुरे आणि विनाटॅगवाली गुरे पकडण्यास सुरवात करणार आहे तसेच गुरांचे आणि कुत्र्यांचे लवकरात लवकर निर्बीजीकरण करू, असे आश्वासन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
गणेशोत्सव जवळ येत आहे. त्यामुळे गणेशाच्या आगमनापूर्वी शहरातील सर्व रस्ते आणि विसर्जन रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावेत, अशी मागणी केली. हे काम सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्त्यांमधील खड्डे भरले जातील, असे बाबर यांनी सांगितले. शहरात अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही. कचरागाडीतील कर्मचाऱ्याला सांगितल्यावर ते कर्मचाऱ्याला पाठवतो, असे सांगून टाळाटाळ केली जाते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी रोज तुमच्याकडे यायचे का? तुमचे कर्मचारी काय करतात? असे प्रशांत साळुंखे यांनी खडसावले. त्यानंतर तत्काळ कर्मचाऱ्यांना सांगू, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
बाकड्यांचे समान वाटप करा – रत्नागिरी पालिकेला बाकडी मिळाली आहेत; परंतु ही बाकडी सत्तेमध्ये असलेल्या माजी नगरसेवकांनाच दिली जात आहेत. आम्हीदेखील माजी नगरसेवक आहोत. आमच्या प्रभागात का दिली जात नाहीत, असा सवाल शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. बाकड्यांसह निधीचे प्रत्येक प्रभागात समान वाटप व्हावे, अशी मागणी उबाठाच्या नगरसेवकांनी केली.