‘न्याय द्या.. न्याय द्या.. स्थानिकांना न्याय द्या..! स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळालेच पाहिजे…, शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे… कंत्राटी शिक्षक भरती झालीच पाहिजे.. स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थानिक शिक्षक घेतलाच पाहिजे.. अशा घोषणा देत डीएड-बीएड बेरोजगारांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आवार दणाणून सोडले. कंत्राटी शिक्षक भरतीच्या समर्थनार्थ बुधवारी रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर रत्नागिरी जिल्हा डीएड बीएड अर्हताधारकांनी जोरदार धरणे आंदोलन केले याचे नेतृत्व समन्वयक सुदर्शन मोहिते, अजिंक्य पावसकर (संगमेश्वर), गिरीश जाधव (रत्नागिरी संजय कुळये (रत्नागिरी), सुनीती महाडीक (मंडणगड), सुप्रिया तोडणकर (दापोली), प्रज्ञा कदम (चिपळूण), मृदुला देसाई (लांजा), रुपाली वाघे (गुहागर) यांनी केले.
यावेळी शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. गेली अनेक वर्ष कोकणातील सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय होत आला आहे. भरतीवेळी स्थानिकांना डावलण्यात येते. आणि म्हणून डीएड-बीएड बेरोजगारांनी यापूर्वी सात दिवस उपोषण केले होते. याची. दखल घेऊन मंत्रालयातून ५ सप्टेंबर रोजी कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात आदेश काढण्यात आला होता मात्र अद्यापही या आदेशाची कार्यवाही करण्यात न आल्यामुळे या आदेशाप्रम ाणे स्थानिकांना कंत्राटी शिक्षक म्हणून सामावून घ्या अशी मागणी करत पुन्हा एकदा बुधवारी रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर या डीएड-बीएड बेरोजगारांनी धरणे आंदोलन केले.
जिल्ह्यातील भूमिपुत्रांना न्याय मिळावा अशी मागणी या स्थानिकांची असून याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. तरच या आदेशाची कार्यवाही होऊन स्थानिकांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे.