25.2 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeChiplunचिपळुणात तिन्ही इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

चिपळुणात तिन्ही इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

राजकीय वातावरण आता पासूनच तापू लागले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक असलेले प्रशांत यादव, राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडून शेखर निकम आणि शिवसेनेकडून इच्छुक असलेले सदानंद चव्हाण या तिन्ही इच्छुक नेत्यांनी गेल्या ४ दिवसात जोरदार असे शक्तिप्रदर्शन करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये भाजपने मात्र अत्यंत बचावात्मक पवित्रा घेत सावध भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक पक्षातून इच्छुक पुढे सरसावले असून तयारी देखील केली जात आहे.

प्रत्यक्षात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असला तरी, प्रत्येक पक्षातील इच्छुक आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारी मिळण्यासाठी फिल्डिंग लावून आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण आता पासूनच तापू लागले आहे. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघ देखील त्याला अपवाद ठरलेला नाही. गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता येथे देखील निवडणुकीचे वारे जोरदार फिरू लागले आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने चिपळूणमध्ये आले होते.

त्यावेळी विद्यमान आमदार शेखर निकम यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून आपली लोकप्रियता कायम असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याचा शब्द देखील दिला. अर्थात तेच उमेदवार असतील हे देखील त्यांना माहीत आहे. मात्र अजितदादांनी देखील जमलेली गर्दी पाहता व येथे झालेली कामे पाहता शेखर निकम यांच्या पाठी उभे रहा आशा शब्दात उमेदवारीचे स्पष्ट संकेतच दिले.

शरद पवारांचा दौरा – अजितदादांच्या पाठोपाठ खा. शरद पवार चिपळूणमध्ये दाखल झाले.त्यांचा प्रवेश होण्यापूर्वीच चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचा जणू झंझावातच सुरू झाला. लक्षकेंद्रित अशी बाईक रिक्षा रॅली, शरद पवार यांचे जल्लोषी स्वागत आणि जाहीर सभेला उसळलेली ऐतिहासिक गर्दीच्या माध्यमातुन प्रशांत ‘यादव यांनी अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन करून चिपळूणचे राजकीय वातावरणच अक्षरशः ढवळून काढले. दोन दिवसाचे वातावरण पाहता खुद्द शरद पवार यांनी देखील प्रशांत यादव यांच्या पाठी उभे रहा असे आवाहन केले.

माजी आमदार चव्हाणांचेही शक्तीप्रदर्शन – सोमवारी दुपारी शरद पवार यांची सभा संपली तर सायंकाळी माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याला समर्थक व कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली. शहरातील इंदिरागांधी सांस्कृतिक केंद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील एक प्रकारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. साहेब पुन्हा आमदार व्हा. आशा शब्दात कार्यकर्ते, हितचिंतक व समर्थकांनी शुभेच्छा देऊन पुढील निवफणुकीची जणू चाहूल निर्माण केली. अर्थात सदानंद चव्हाण देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यावेळी इच्छुक आहेत.

प्रशांत यादव वरचढ ? – तिन्ही इच्छुक उमेदवारांनी आपल्यापरीने शक्तिप्रदर्शन केले. त्यामध्ये प्रशांत यादव यांची बाजू वरचढ दिसून आली. तसेच त्यांच्या कार्यक्रमाला काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट असे मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडी येथे अद्याप तरी एकसंघ असल्याचे देखील यावेळी दिसून आले. मात्र अजितदादा यांच्या सभेकडे भाजपने मात्र पाठ फिरवलेली दिसून आले. काही मोजके कार्यकर्ते वगळता भाजपचे पदाधिकारी कोणीही दिसून आले नाहीत. तसेच सदानंद चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे काही पदाधिकारी पोहचले पण शुभेच्छा देऊन परत फिरले. त्यामुळे भाजपने अद्याप तरी बचावात्मक तसेच सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले.

RELATED ARTICLES

Most Popular