पवित्र पोर्टलद्वारे झालेल्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार १४ जणांची नियुक्ती झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियुक्तीची प्रक्रिया रखडली होती; परंतु मतदानानंतर ही भरती करावी, असे शासनाचे आदेश मागील महिन्यात आले होते. त्यानुसार पुढील आठ दिवसांत जिल्ह्यातील रिक्त शाळांना शिक्षक मिळणार असून, त्यासाठी समुपदेशनची तारीख निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाने राज्यात तीन महिन्यांपूर्वी प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांचा विचार करून पवित्र पोर्टलवरून भरती प्रक्रिया केली होती.
जिल्ह्यात १ हजार ६८ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती. त्यापैकी १ हजार १४ च उमेदवार या प्रक्रियेला हजर राहिले होते. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मार्च महिन्यात ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती; मात्र शाळांमधील रिक्त पदांवर नवीन शिक्षकांना नियुक्ती देण्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या कराव्यात, अशी मागणी संघटनांनी केली होती. याची दखल राज्य शासनाने घेतली. जिल्हास्तरावर सुमारे पावणे दोनशे शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर तालुकांतर्गत समुपदेशन प्रक्रिया घेण्यात आली. त्यानुसार १९ व २० मार्चला हे समुपदेशन रत्नागिरीत होणार होते.
निवडणूक आयोगाच्या परवानगी शिवाय ही प्रक्रिया करता येणार नसल्यामुळे समुपदेशन पुढे ढकलण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. असे असले तरी समुपदेशनच्या आदल्या दिवशी हा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. आचारसंहिता माहिती असताना समुपदेशन लावणे ही बाब चुकीचीच असल्याचे दिसून येते. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. त्यानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मार्गदर्शन पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे.
ज्या जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया होईल त्या तारखेनंतर ही बदली प्रक्रिया करावी, असे आदेश दिले आहेत. या आदेशाचा संदर्भ घेत समुपदेशन प्रक्रियेची तारीख निश्चित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात हे नवे शिक्षक मिळणार आहेत. असे असले तरी आंतरजिल्हा बदली हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे.