जिल्हा शासकीय रुग्णालयाला कोट्यवधीचे अत्याधुनिक एमआरआय मशीन मंजूर आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी हे मशीन महत्त्वाचे आहे. खासगी रुग्णालयात एमआरआयसाठी हजारो रुपये मोजावे लागतात. ती सुविधा जिल्हा रुग्णालयामध्ये मोफत मिळते; परंतु मंजूर एमआरआय मशीन अडकले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय रुग्णालय असो वा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असो वरिष्ठांनी अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून मशीन येण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. जिल्हा रुग्णालयाकडून यापूर्वीच मशीनसाठी प्रस्ताव गेला होता. दरम्यान, जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग झाले. आता त्याचा पाठपुरावा करायचा कोणी, असा प्रश्न निर्माण झाल्याचे समजते. जिल्हा रुग्णालयामध्ये कोट्यवधी रुपयाच्या एमआरआय मशीनसाठी यापूर्वीच प्रस्ताव गेला होता. एका एजन्सीद्वारे ही मशीन बसवण्यात येणार होती. त्याच्या देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी काही वर्षे त्यांचीच होती.
राज्य शासनाने राज्यातील विविध जिल्हा रुग्णालयांसाठी या मशीन देण्याचा निर्णय घेतला होता; परंतु रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचा कारभार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे गेला. त्यामुळे त्याचा पाठपुरावा कमी पडला. दरम्यान, रत्नागिरीला मिळणारे हे मशीन रायगड जिल्ह्याकडे वळवण्याचाही प्रयत्न झाला; परंतु जिल्हा रुग्णालयाने त्याबाबत पाठपुरावा करून हा प्रकार थांबला. आता या एमआरआय मशीनबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पाठपुरावा करत आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी हे मशीन महत्त्वाचे आहे. खासगी रुग्णालयात एमआरआय करायचे म्हटले, तर सात हजार रुपयांच्या वर पैसे मोजावे लागतात. तेच मशीन जर जिल्हा रुग्णालयात बसले, तर अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना बसणारा आर्थिक भुर्दंड बंद होणार आहे. त्यामुळे एमआरआय मशीन येण्यापासून कुठे अडकले आहे, याची जोरदार चर्चा सुरू आहे. समन्वयाने याचा पाठपुरावा करून ते लवकरात लवकर आणावे, असे अनेकांचे मत आहे.