जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ४५४ कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती दिल्यापासून अजूनही मानधनच दिले गेलेले नाही. मानधनासाठी निधी उपलब्ध असतानाही प्राथमिक शिक्षण विभाग वेळकाढू धोरण घेत असल्यामुळे कंत्राटी शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गतवर्षीचा शिल्लक निधी यंदा खर्ची टाकला जावा, यासाठी शिक्षणविभागाने शिक्षण संचालकांकडे मार्गदर्शन मागवले आहे. त्यामुळे कंत्राटी शिक्षकांना मानधनासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त पदांची संख्या वाढू लागल्यामुळे शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय २३ सप्टेंबर २०२४ रोजी घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील ४५४ स्थानिक बीएड्, डीएड्, बेरोजगारांना रोजगार मिळाला. त्यांना १५ हजार मानधन देण्याचा निर्णय झाला. तसेच याचा फायदा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना झाला तसेच शैक्षणिक समतोल राखण्यास मदत मिळाली; मात्र नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षकभरती बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
त्यामुळे ४५४ कंत्राटी शिक्षकांवर नियुक्ती रद्दची टांगती तलवार निर्माण झाली आहे. त्यांना ३० एप्रिलला कार्यमुक्त करण्यात येणार आहे. हे शिक्षक कार्यमुक्त होणार असले तरीही त्यांना मानधनच दिले गेलेले नाही. गेले चार महिने ते मानधनाशिवाय काम करत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले. शासनाने कंत्राटी शिक्षकांच्या मानधनाची तरतूद गतवर्षी केलेली होती; मात्र गतवर्षी काही रक्कम शिल्लक होती. त्यामधून कंत्राटी शिक्षकांचे मानधन देणे आवश्यक होते; परंतु शासनाच्या लालफिती कारभारात मानधनाचा विषय अडकून पडलेला आहे. सध्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासनाकडे निधी खर्ची करण्याबाबत मार्गदर्शन मागवले आहे. १५ दिवस झाले तरीही वरिष्ठांकडून उत्तर आलेले नाही. या शिक्षकांना शिमगोत्सवासाठी तरी पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती; मात्र त्यांचा शिमगा हा मानधनाविनाच गेलेला आहे.
शिक्षकांचे शुक्रवारी आंदोलन – कंत्राटी शिक्षकांचे वेतन न झाल्यामुळे २८ मार्चला जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करत असल्याचा इशारा डीएड्, बीएड् कंत्राटी शिक्षक संघटनेच्यावतीने दिला आहे. तसे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. या सर्व शिक्षकांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे या सर्व शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. २७ मार्चपर्यंत शिक्षकांचे वेतन न झाल्यास आंदोलन करणार आहोत, असा इशारा डीएड्, बीएड् कंत्राटी शिक्षक संघटनेच्यावतीने सुदर्शन मोहिते यांनी दिला आहे.