राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे शिवसेना अशी महाविकास आघाडी आहे. तरीही राजापुरात ठाकरे गटाचे खासदार व आमदार काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. कार्यक्रमात सहभागी करून घेत नाहीत. विकासकामांकडे दुर्लक्ष करत मनमानी करतात, असा आरोप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे राजापुरात महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्रित व एकसंघपणे काम करण्याचे धोरण ठरलेले असतानाही राजापुरात ठाकरे गटाच्या आमदार आणि खासदारांकडून होत असलेल्या मनमानीचा व अन्यायाचा पाढा कॉंग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वाचला.
अशीच भूमिका यापुढेही कायम राहणार असेल तर याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे मत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडले. राजापूर तालुका काँग्रेस कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी (ता. १३) काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार आणि आमदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. राजापुरात ही मंडळी मनमानी करत असल्याचा आरोप करण्यात आला. आगामी निवडणुका लक्षात घेता ज्या भागात अद्यापही बूथ कमिट्या व मंडळ कमिट्या नियुक्त झालेल्या नाहीत. त्या त्यांनी पूर्ण कराव्यात, अशा सूचना सौ. खलिफे यांनी केल्या.
नवरात्रोत्सवात जिल्हा परिषद विभागनिहाय दौऱ्याचेही नियोजन करण्यात आले. बैठकीला माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, किशोर नारकर, जितेंद्र खामकर, ओंकार प्रभुदेसाई, देवदत्त वालावकर, प्रदीप भाटकर, नाना कुवेसकर, बाजी विश्वासराव, सुधीर मोरे, गोपाळ गोंडाळ, मलिक गडकरी, मजिद सायेकर, महिला आघाडीच्या सावित्री कणेरी, रघुनाथ आडीवरेकर आदी उपस्थित होते.