आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून ५७८ फिर्यादी व साक्षीदारांची ६ कोटी ३६ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी चार संशयित संचालकांविरुद्ध १५ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रसाद शशिकांत फडके, संजय विश्नाथ सावंत, संजय गोविंद केळकर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ते मागील २ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, फरारी संशयित अमन महादेव जाधव ऊर्फ अॅनी याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी तपासामध्ये सबळ पुरावा प्राप्त करून २५ तारखेला १५ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
चारही संशयितांनी आरजू टेक्सोल कंपनी कामगार आयुक्त, रत्नागिरी यांच्याकडे तसेच आरजू टेक्सोल प्रा. लि. ही कंपनी रजिस्टार ऑफ कंपनी पुणे यांच्याकडे नोंदणी केलेल्या आहेत. आजू टेक्सोल प्रा. लि. कपंनीचे पांपलेय लोकांमध्ये वाटून, स्थानिक वृत्तपत्रात जॉब वर्क पद्धतीने काम घ्या. आम्हाला प्रोडक्ट तयार करून द्या, जास्तीत जास्त उत्पादने तयार करण्यासाठी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना रोजगाराची सुवर्ण संधी, अशा स्वरूपाची जाहिरात केली. कंपनीला गुंतवणूकदार लोकांकडून ठेवी/गुंतवणूक घेण्याची परवानगी नसतानाही संशयितांनी लोकांकडून डिपॉझिट घेऊन त्यांना वेगवेगळ्या मशीन देऊन, त्यांना कच्चा माल दिला.
मशीनवर तयार केललेला पक्का माल परत घेऊन, त्याबदल्यात त्यांना योग्य मोबदला देण्याचे आमिष दाखवले. तसेच फिर्यादी व साक्षीदार/गुंतवणूकदार यांनी कंपनीमध्ये डिपॉझिट ठेवलेल्या रकमेवर आर ओई (RETURN OF INCOME) म्हणून गुंतवणूकदारांना ६० महिने बँकेपेक्षा जास्त परतावा देतो, तसेच ६० महिन्यांनंतर अनामत रक्कम परत करतो, असे सांगून तक्रारदारासह ५६९ साक्षीदार/गुंतवणूकदार यांच्याकडून रकमा स्वीकारल्या; परंतु दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मोबदला व परतावा न देता तसेच त्यांना कच्चा माल, मशिनरी व साहित्य न पुरविता एकूण ५७८ फिर्यादी व साक्षीदार यांची ६ कोटी ३६ लाख ६० हजार १८२ रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.