खेड शहरासह ग्रामीण भागाला गेले २ दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जगबुडी नदीने सुमारे ७ मीटरची धोक्याची पातळी गाठताच पुराचे पाणी शहरात घुसू लागले होते. जगबुडी नदीला पूर आल्याने किनाऱ्यावरील बंदर रोड पाण्याखाली गेला असून पुराचे पाणी पालिकेच्या मटण- मच्छी मार्केट येथून बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाल्याने नागरीक धास्तावले आहेत. शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनासह व्यापारी आणि नागरिकही सतर्क झाले आहेत.
गुरुवारी दि.६ रोजी सकाळी ८ ते शुक्रवारी दि.७ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासात खेडमध्ये ६४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण ६९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी ११ वाजता जगबुडी नदीने ६.७५ मीटर पातळी गाठल्यानंतर प्रशासन सतर्क झाले होते. नदी किनाऱ्यावरील गावातील नागरिकांना तसेच खेड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना धोक्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला. अतिवृष्टीची परिस्थिती पाहता शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचता यावे म्हणून नियोजित वेळे पूर्वीच पालकांसोबत संपर्क साधून घरी पाठवले.
मटण-मच्छीमार्केटमध्ये पाणी – खेड शहर जगबुडी नदी व नारिंगी नदी किनारी वसलेले असून या नद्यांना येणाऱ्या पुराचा फटका खेड बाजारपेठेला बसतो. शुक्रवारी सकाळी १२ वाजल्यापासून जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी पालिकेच्या मटण – मच्छी मार्केट परिसरातून बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाली. नारिंगी नदीला आलेल्या पुराचे पाणी शहरातील नाना-नानी पार्क जवळून खेड – दापोली मार्गावर येण्यास सुरुवात झाल्याने वाहनचालक धास्तावले होते. पर्जन्यवृष्टी सुरूच असून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात देखील नागरीक भयभीत झाले आहेत.
भातशेतीचे नुकसान ? – नदी किनाऱ्यावर बहुतांश भातशेती असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील चोरद, नारिंगी, सोनपात्रा इत्यादी उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्याने नुकत्याच करण्यात आलेल्या लावणीचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
नातूवाडी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस – खेड तालुक्यातील नातुवाडी धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात ११५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण १२१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या धरणात १३.०५९ दशलक्ष घन मीटर एव्हढा पाणीसाठा झाला आहे. धरण ४७.९६ टक्के भरले असून अतिवृष्टीमुळे त्यात वेगाने वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वृक्ष कोसळले – मुसळधार पावसासह वाराही जोरात असल्याने शिवतर रोडवर झाड कोसळून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. खेड-शिवतर रोडवरील मुरडे येथे एक महाकाय वृक्ष कोसळल्याने खेड, शिवतर, जामगे, आंबये, मुरडे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. परिसरातील नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन पडलेले झाड तोडून मार्ग मोकळा केला. बाजारपेठेतील प्रसिद्ध पिंपळ वृक्षाची फांदीदेखील तुटली आहे.
वीजपुरवठा खंडीत – खेड शहरातील बाजारपेठेत असलेल्या राष्ट्रीय मारूती मंदिराशेजारी पिंपळाच्या झाडाची एक मोठी फांदी तुटून पडल्याने बाजारपेठेतील वीजप्रवाह खंडित झाला. तीनबत्ती नाकाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरातील व्यापारी आणि म हावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ही फांदी तोडून बाजूला केली. त्यानंतर वीजप्रवाह सुरळीत झाला.
वाहतूक धीम्यागतीने – मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक धीम्यागतीने सुरू होती. भरणेनाका येथे छत्रपती शिवाजी म हाराजांच्या पुतळ्याजवळ पाणी साचले होते. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आल्याचे बोलले जात आहे.