गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भाऊबीज भेट, तसेच आशांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ या मागण्यांचा शासननिर्णय काढल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा आयटक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते शंकर पुजारी यांनी दिला. १२ जानेवारीपासून बेमुदत संपाची हाक दिली असून सोमवारी (ता. ८) आशा व गटप्रवर्तक महिलांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेवर धडक दिली. संपाची नोटीस व निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांना देण्यात आले.
गेले काही महिने लढा देऊनही आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या शासनाने मान्य केलेल्या नाहीत. मंत्री फक्त आश्वासन देत असल्यामुळे आशांमध्ये तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत. मागण्यांचे शासन निर्णय तातडीने काढले जावेत यासाठी ही संपाची हाक दिल्याचे संघटनेकडून आजा सांगण्यात आले. जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करत सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. २९ डिसेंबरपासून सर्व ऑनलाईन कामावर बहिष्कार घातलेला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यानीं ऑनलाईन कामाबाबत सक्ती करता कामा नये. अन्यथा फक्त त्या विरोधीही आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
शंकर पुजारी म्हणाले, महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी १८ ऑक्टोबर २०२३ पासून बेमुदत संप केलेला होता. या संदर्भात ८ नोव्हेंबरला तडजोड झाली. त्यात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय आदेश अद्याप मिळालेले नाहीत. या घटनेला दोन महिने झाले आहेत. तरी अद्याप महाराष्ट्र शासन काही निर्णय घेण्यास तयार नाही. त्यामुळे महिलांमध्ये असंतोष वाढत चाललेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी या संपामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी सुमन पुजारी, शंकर पुजारी, विजया शिंदे, विद्या भालेकर, पल्लवी पारकर, संचिता चव्हाण, तनुजा कांबळे, संजीवनी तिवडेकर, सोनाली बाईक आदी उपस्थित होते.