मानधन देण्यात होत असलेल्या अन्यायकारक भूमिकेविरोधात महाराष्ट्र आशा सुपरवायझर्स कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने मुंबईतील आझाद मैदानात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात राज्यातील ३ हजार आशांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रत्नागिरीतील सुमारे ५० हून अधिक आशा, स्वयंसेविका उपस्थित होत्या. दुपारी संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक सुभाष बोरकर यांना निवेदन दिले. निवेदनासंदर्भात बोलताना ज्येष्ठ कामगार नेते एम. ए. पाटील म्हणाले, महाराष्ट्रामध्ये ३५०० पेक्षा जास्त आशा सुपरवायझर्स या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये महत्त्वाचे काम करत आहेत.
इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही प्रत्येक ११ महिन्याला कंत्राटी पद्धतीने त्यांची नेमणूक केली जाते; परंतु इतर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना जे मानधन व लाभ दिले जातात ते मात्र आशा सुपरवायझर्सना दिले जात नाहीत. हे अत्यंत अन्यायकारक असून यातील भेदभाव त्वरित दूर करावा. इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा एकूण २५ हजार रुपये पगार मिळतो तर आशांना फक्त ६२०० इतकेच मानधन मिळते. इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना वर्षाला १५ टक्के बोनस, पाच टक्के पगारवाढ, बाळंतपणाची रजा व किरकोळ रजा इत्यादी लाभ दिले जातात. इतकेच नव्हे तर ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना शासकीय सेवांमध्ये कायम करण्याचे सुद्धा शासनामार्फत विचार सुरू आहेत. या सर्वांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आशांना या लाभापासून वंचित ठेवलेले आहे.