महाराष्ट्र मंत्रिमंडळात आशा व गटप्रवर्तक महिलांना मानधन वाढ देण्याबाबत आर्थिक तजवीज करण्यासाठी मुख्य सचिवांनी अहवाल सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आशा व गटप्रवर्तक महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना मानधन वाढीबाबत शासन निर्णय जाहीर करावा, अशी मागणी केली होती. त्याबाबत निर्णय न झाल्यामुळे मुंबई आझाद मैदान येथे मागील सहा दिवसांपासून हजारो आशा व गटप्रवर्तक महिलांचे आंदोलन सुरू आहे.
यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे चारशेहून अधिक महिला सहभागी आहेत. मुंबईतील आझाद मैदानात मागील सहा दिवसांपासून आशा, गटप्रवर्तक महिला आंदोलन करत आहेत. आमदार विद्या चव्हाण यांनी ज्येष्ठ कामगार नेते शंकर पुजारी, कॉम्रेड राजेंद्र साठे, कॉम्रेड अर्चना घुगरे व उषा मेश्राम यांची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट घडवून आणली. त्यांच्यापुढे आशा, सचिव डॉ. नितीन करीर यांना तत्काळ अहवाल देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. आशा व गटप्रवर्तक यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये सहानुभूती असून, त्यांना आम्ही निश्चितपणे मानधन वाढ देणार आहोत.
बैठकीनंतर आझाद मैदानात जमलेल्या हजारो महिलांना मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेची माहिती देण्यात आली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार विद्या चव्हाण यांनी तातडीने लक्ष घालून वेळ काढून मुख्यमंत्र्यांची भेट घडवून दिल्याबद्दल आभार मानले. आझाद मैदानात राज्यातील २० हजार महिला सहभागी होत्या. दरम्यान, हा संप न्याय मिळेपर्यंत चालूच ठेवण्यात येईल तसेच आंदोलनाबद्दल कृती समितीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.