31.2 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

जिल्ह्यातील वसतिगृहांची सुरक्षा वाऱ्यावर…

जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाची मुला-मुलींची १० वसतिगृह आहेत;...

पाच लाख ३६ हजार लाभार्थ्यांना ‘गोल्डन कार्ड’ – जनआरोग्य योजना

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा...
HomeMaharashtraसैफ अलीवर हल्ला करणाऱ्याचा शाहरूख खानवरही होता डोळा !

सैफ अलीवर हल्ला करणाऱ्याचा शाहरूख खानवरही होता डोळा !

आरोपीने सैफ अली खानवर सुऱ्याने सपासप वार केले आणि पळून गेला.

बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चाकूने प्राणघातक हल्ला करणारा आरोपी अजूनही मोकाटच असून पोलीसांची १० पथके त्याला शोधण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत. दरम्यान याप्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र चौकशीनंतर त्याचा सैफवरील हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलीसांनी दिले आहे. पोलीसांचा सैफ अली खानच्या घरातील काही नोकरांवर संशय असून घरात असलेल्या व्यक्तींपैकीच कुणाचेतरी साटंलोटं आरोपीशी नाही ना? याअनुषंगाने तपास सुरू आहे. चोरीसाठी घुसलेल्या चोरट्याने सैफ अली खानकडे १ कोटी रूपये मागितले होते अशीही माहिती पुढे आली आहे. ही माहिती नर्सने तक्रारीमध्ये दिल्यानंतर हा संशय अधिक बळावला आहे. दरम्यान सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या चोराने शाहरूख खानच्या “मन्नत’ बंगल्यातही घुसण्याचा प्लॅन आखला होता, त्याने शाहरूखच्या बंगल्याची रेकीदेखील केल्याचे पुढे येत आहे.

बुधवारी मध्यरात्रीचा थरार – बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सैफ अली खान राहत असलेल्या वांद्रेतील घरात घुसलेल्या व्यक्तीने सैफ अली खानवर चाकूने सपासप वार केले होते. एकूण सहा वार त्याने केले. त्यामध्ये सैफ अली खान गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. गुरूवारी सकाळी त्याच्यावर २ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याच्या पाठीच्या मणक्यात आरोपीने भोसकलेल्या सुऱ्याचा एक तुकडा घुसला होता. डॉक्टरांनी हा अडीच इंचाचा तुकडा शस्त्रक्रिया करून बाहेर काढला आहे. सैफ सध्या अतिदक्षता विभागामध्ये असून त्याची प्रकृती चांगली आहे. शुक्रवारी रात्री कदाचित त्याला आयसीयूमधून स्पेशल रूममध्ये दाखल केले जाईल असे डॉक्टरांनी सांगितले.

चोरीच्या उद्देशाने घुसला – मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस बुधवारी मध्यरात्रीपासूनच तपास करत असून अजूनही आरोपी सापडलेला नाही. पोलीसांची १० पथके त्याचा शोध घेत आहेत. मात्र तो अजूनही सापडलेला नाही. सैफ अली खानच्या शेजारच्या इमारतीमधून उडी मारून चोरीच्या उद्देशाने आरोपी घरात घुसला होता. अग्निशमन यंत्रणेसाठी उभारलेल्या शिडीच्या आधारे पायऱ्या चढत तो सैफ अली खानच्या मुलांच्या खोलीत घुसला. तेथे देखभालीसाठी असलेल्या नर्सशी त्याने हुज्जत घातली. तिला मारहाण केली. त्यांनतर तिने आरडाओरडा केला. तेव्हा सैफ अली खान त्याच्या बेडरूममधून तिथे आला. तेव्हा घुसखोर त्याच्याशी हुज्जत घालू लागल्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न सैफ अली खानने केला. त्यावेळी त्या घुसखोराने सैफ अलीवर धारधार सुऱ्याने ६ गंभीर वार केले. सैफ अली खान, रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. सध्यां तो लिलावती रूग्णालयात उपचार घेत आहे.

अजूनही मोकाट – सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर पळालेल्या आरोपीचा अजूनही पोलीसांना ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान गुरूवारी रात्री एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्याचा सैफवर झालेल्या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे असे मुंबई पोलीसांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या हल्लेखोराला पकडण्याचे आव्हानः पोलीसांसमोर आहे. १० पोलीस पथके जंगजंग पछाडत आहेत. मात्र तो सापडलेला नाही.

१ कोटी रूपये मागितले – हा इसम चोरीच्या इराद्याने घरात घुसला असा दावा आहे. मात्र सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांनी विशेषतः मुलांची देखभाल करण्यासाठी नेमलेल्या फिलिप उर्फ लीमा हिने पोलीसांना दिलेल्या तक्रारीमध्ये सदर व्यक्तीने १ कोटी रूपयांची मागणी केली असे म्हटले आहे. सैफ जेव्हा मुलांच्या रूममध्ये आला तेव्हा त्या घुसखोराने आपल्या हातातील चाकू त्याच्यावर उगारला. तुला काय हवे आहे? असे सैफने त्याला विचारले असता त्याने पैसे असे सांगितले. यावर सैफने किती हवेत अशी विचारणा केली असता १ कोटी रूपयांची मागणी केल्याचे लीमा यांनी पोलीसांकडे नोंदविलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे. त्याचवेळी घरात कामाला असणाऱ्या आणखी २ महिला तेथे आल्या. आता आपण पकडले जावू शकतो असा संशय आल्याने आरोपीने सैफ अली खानवर सुऱ्याने सपासप वार केले आणि पळून गेला.

घरातीलच व्यक्तीचा सहभाग ? – आता या हल्ल्यामध्ये सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांचा सहभाग असावा असा संशय पोलीसांना येतो आहे. कारण इमारतीला असलेली सुरक्षा पाहता इतक्या सहजासहजी कोणी घरात घुसेल अशी शक्यता वाटत नाही. सहजपणे घरात घुसू शकतो आणि हल्ला केल्यानंतरही सर्वांसमोर सहजपणे पळून कसा जातो या प्रश्नाचे उत्तर पोलीस शोधत आहेत. घरातील कर्मचारी किंवा अन्य कोणाचातरी संशयित आरोपीशी संपर्क असावा आणि त्या व्यक्तीनेच त्याला बोलावले असावे असा कयास आहे.

कर्मचाऱ्यांचे आणि चोराचे साटंलोटं ? – जेव्हा चोरटा घरात घुसला तेव्हा तो सर्वांत आधी मुलांची देखभाल करण्यासाठी नेमलेल्या नर्सलां दिसला. तिच्याशी त्याची झटापट झाली. नंतर सैफ तिथे आला. त्यांनतर २ महिला कर्मचारी आल्या. या कर्मचाऱ्यांवर त्याने चाकू हल्ला केला नाही केवळ सैफवरच हल्ला झाला. नर्सला फार मोठी इजा झालेली नाही किंवा तिच्यावर चाकूने हल्ला केलेला नाही. यामुळे सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांचे आणि आरोपीचे काही साटंलोटं आहे का? या अनुषंगाने तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular