मागील १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गाचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी रस्त्याला तडे गेले असून खड्डे पडले आहेत तर रस्त्यावर सिमेंट काँक्रिटची खडीही आहे. महामार्ग कामाचे ‘ऑडिट’ करावे, अशी मागणी केली जात आहे. या मागणीची सरकारकडून गंभीर दखल घेण्याचे साकडेही गणेशभक्तांनी घातले आहे. महामार्गाचे ऑडिट झाल्यास दर्जाहीन कामाची पोलखोल होईल, असे प्रवाशांचे मत आहे. महामार्गाच्या कामावर आतापर्यंत १ हजार ५६४ कोटी रुपये खर्च करूनही काम अपूर्ण आहे.
कासू ते इंदापूर या ४२ किलोमीटर रस्त्यासाठी ४१५ कोटी, पनवेल ते कासूदरम्यानच्या रस्त्यासाठी २५१ कोटी असे ६६६ कोटी खर्च झाले आहेत. यापूर्वी याच मार्गावर ८९८.९२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. नव्याने सुधारित मंजुरीनुसार १ हजार ५६४ कोटी रुपये केवळ ८४ किलोमीटरसाठी खर्च होणार आहेत. हा कोकणवासियांच्या डोक्यावर भुर्दंड आहे. महामार्गाच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्चुनही महामार्गाचे काम अर्धवट आहे. रस्त्यावरील काँक्रिटीकरणाची खडी दिसू लागली आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामाबाबत सांशकता आहे. पोलादपूरपासून सुरू झालेल्या महामार्गाच्या रस्त्यावर जागोजागी चर गेले आहेत.
कशेडी बोगद्याच्या अलिकडे १ किलोमीटर अंतरावर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर ६ इंच खोल असे लहान-मोठे खड्डे आहेत. या मार्गावरही काँक्रिटच्या मिश्रणातील खडी दिसत असल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुलावरील खडी डांबरापासून वेगळी होत असून, रस्त्याकडेला पसरलेली आहे. त्यामुळे नवीन रस्त्यावरील प्रवास खडतर बनला आहे.
कामाचा दर्जा पाहून कार्यवाही करा – आधीच महामार्गाची ‘वाट’ बिकट बनली आहे. त्यात दर्जाहीन कामाची भर पडल्याने महामार्ग चर्चेत आला आहे. महामार्गाच्या कामाचा दर्जा पाहता ‘ऑडिट’ करा, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते, हे पाहावे लागणार आहे.