सिंधुदुर्गातील देवगड-तळेबाजार येथे रिक्षा भाड्याने घेऊन जात तळेरे येथील रिक्षा चालकाला गुंगीचे औषध देऊन सोन्याचे दागिने व रोख रकमेसह तब्बल ८४ हजार ५०० रुपयांना एका जोडप्याने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कणकवली पोलिसांत संशयित जोडप्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी तालुक्यात असा प्रकार घडला होता, आत्ता तळकोकणात घडलेल्या या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
रिक्षाचालक संजय तुकाराम तळेकर ६५, तळेरे- गावठण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वा.च्या सुमारास एक जोडपे तळेरे बस स्टँडजवळ संजय तळेकर यांच्या रिक्षाकडे जात आपल्याला तळेबाजार येथे जायचे असल्याचे सांगितले. यातील त्या पुरुषाचे वय ३५ ते ४० वर्षे तर महिलेचे वय २५ ते ३० वर्षे होते. त्यांच्यासोबत सुमारे दोन ते अडीच वर्षाचे एक लहान मूल असल्याचे म्हटले आहे.
त्या जोडप्याने आम्हाला तळेबाजार येथे देवीच्या मंदिरात जायचे असल्याचे तळेकर यांना सांगितले. त्यावर श्री. तळेकर यांनी एक हजार रुपये भाडे होईल, असे सांगितले. ते भाडे मान्य झाल्याने त्या जोडप्याला मुलासह तळेकर हे तळेबाजर येथे देवी मंदिराजवळ घेऊन गेले. दरम्यान, त्या जोडप्याने तळेकर यांच्याशी गप्पा मारत प्रवास केला. ते हिंदी मध्ये बोलत होते. आम्हाला मूल व्हावे म्हणून आपल्या मित्राने या देवीकडे मन्नत मागितली होती, ती पूर्ण करण्यासाठी आज या देवाला नवस फडण्यासाठी आल्याचे त्या जोडप्याने तळेकर यांना सांगितले. पुढे ते कुणकेश्वरला गेले, दरम्यान त्या जोडप्याने आम्ही गणपतीपुळे येथील देवदर्शनाचा पेढा रिक्षाचालक तळेकर यांना पेढा दिला. त्यानंतर जोडप्याने रिक्षा एका टपरीजवळ थांबवण्यास सांगितली.
रिक्षा थांबवल्यावर त्या जोडप्याने तळेकर यांना एक थंड पेयाची बाटली आणून दिली. ते थंडपेय तळेकर प्यायले. त्यानंतर आम्हाला पुन्हा तळेरे स्टँड येथे सोडा असे सांगितले. त्यानंतर पुढे काय घडले हे मला आठवत नसल्याचे श्री. तळेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
तळेकर यांना मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वा. पूर्ण शुद्ध आली त्यावेळी त्यांना आपण लुटलो गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात त्यांचा असा एकूण ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल त्या जोडप्याने लंपास केल्याची फिर्याद श्री. तळेकर यांनी दिली आहे.