शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे पिल्लू आले होते. पुराचे पाणी ओसरल्यानंतर त्याला बाहेर पडता आले नाही. या घटनेची माहिती वनविभागास दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी या मगरीच्या पिल्लास पिंजऱ्यात जेरबंद केले. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर पुराच्या पाण्यातून वाशिष्ठी नदीतील मगरी लोकवस्तीत येण्याच्या घटना घडतात. रविवारी रात्री नदीपात्रातील पाण्यात वाढ झाल्याने पाण्याच्या प्रवाहातून एक मगरीचे पिल्लू शहरातील वाणीआळी येथील राममंदिराच्या मागे असलेल्या विहिरीत आले. पाण्याचा निचरा झाल्यानंतर मगरीचे पिल्लू विहिरीत होते. त्याला वरती येता येत नव्हते.
विहिरीत मगर असल्याचे मालुसरे यांना सोमवारी सकाळी समजले. त्यानंतर त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला. त्यानुसार विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल राजश्री कीर यांच्या मार्गदर्शनाखाली मालुसरे यांच्या विहिरीत मगर पकडण्यासाठी ट्रॅप पिंजरा सोडण्यात आला होता. या पिंजऱ्यात दोन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर बुधवारी (ता. १७) विहिरीत असलेली मगर पिंजऱ्यात जेरबंद झाली. या मगरीसे सुरक्षितरित्या पिंजऱ्यासह बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या बचावकार्यात वनपाल डी. आर. भोसले, वनरक्षक राहुल गुंठे, आर. आर. शिंदे, नंदकुमार कदम, संजय अंबवकर, सचिन भैरवकर यांनी मदत केली.