प्रसुती दरम्यान बाळ दगावल्याने गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयात गावकऱ्यांनी हंगामा केला. प्रसुतीसाठी दाखल झालेल्या या महिलेला बराच काळ ताटकळत ठेवल्याने ते बाळ दगावले असा गंभीर आरोप वरवेली गावातील मंडळींनी करत रुग्णालयातच ठिय्या ठोकला होता. या प्रकरणी पोलीस स्थानकातही तक्रार नोंदविण्यात आली असल्याचे वरवेलीतील पत्रकारांशी बोलताना सांगितले. काही ग्रामस्थांनी हा प्रकार मंगळवारी घडला. या प्रकरणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच याबाबत त्यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रारही नोंदविली आहे. चौकशीअंती पुढील कार्यवाही करु असे पोलिसांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले आहे. तालुक्यातील वरवेली येथील एक महिला प्रसुतीसाठी गुहागर ग्राम ीण रुग्णालयात मंगळवारी पहाटे ५ वाजता दाखल झाली होती. सकाळी ८ वाजेपर्यंत या महिलेची प्रसुती झाली नव्हती. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला प्रसुतीसाठी इतर रुग्णालयांमध्ये नेण्याचे ठरविले.
मात्र, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला नकार दिला आणि याच रुग्णालयात नॉर्मल डिलेव्हरी होईल असा विश्वास व्यक्त केला असे संबंधित महिलेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान, या महिलेची नॉर्मल प्रसुती झाली मात्र, लगेच बाळ दगावले. डॉक्टरच्या या हलगर्जीपणामुळेच बाळ दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सदर महिलेच्या वरवेली गावातील अनेक ग्रामस्थांना ही माहिती समजताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी तेथे डॉक्टरना जाब विचारला. तुम्ही एवढे तास महिला रुग्णाला का ताटकळत ठेवलात असा सवाल करत तुमच्या हलगर्जीपणामुळेच बाळ दगावल्याचा आरोप केला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जमाव शांत झाला. त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे. मात्र चौकशी करु आणि त्यामध्ये जे काही आढळेल त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करु असे आश्वासन या ग्रामस्थांना पोलिसांनी दिले आहे. दरम्यान या संदर्भात गुहागर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता तो प्रस्थापित होऊ न शकल्याने त्यांचे म्हणणे समजले नाही.

