शहरातील शासकीय तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल १ जानेवारीपासून खेळाडूंसाठी बंद करण्यात आला आहे. अनेकवेळा तहसीलदार, तालुका क्रीडाधिकारी व जिल्हा क्रीडाधिकारी यांना कळवूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने येथील नियमित बॅडमिंटन खेळणाऱ्या युवकांनी २६ जानेवारीला तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देणारे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. उपोषणकर्ते खेळाडू श्रीकांत कदम, अमित गरूड, कपिल कोळेकर, सौरभ नागणे, विपिन पाणापल्ली, जयेश शिर्के, परिमल पाटणे आदी गेली पाच वर्षे या क्रीडा संकुलात नियमित बॅडमिंटन खेळतात.
क्रीडा संकुलाच्या चालकांनी ठरवलेले शुल्क दरवर्षी पूर्ण भरून या खेळाचा आनंद घेतात; मात्र काही लोकांनी शुल्क भरलेले नाही किंवा त्यांच्याकडून संबंधित क्रीडा संकुल चालकांनी शुल्क वसूल केलेली नाही. हे कारण देऊन क्रीडा संकूल होतकरू खेळाडूंसाठी बंद होत असेल तर हे शासकीय क्रीडा धोरणाचे अपयश आहे, असे स्पष्ट मत उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
शासनाने कोट्यवधीचा निधी खर्च करून ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंसाठी उभारलेल्या क्रीडा संकुलाचे ५ डिसेंबर २०१५ ला उद्घाटन करण्यात आले होते. क्रीडा सुविधा संकुलामार्फत होतकरू खेळाडूंना शासनाकडून सुविधा देण्यात आल्या असल्या तरी क्रीडा संकुलाची निगराणी राखण्याचे काम तालुकास्तरीय अधिकारी करू शकत नाहीत, ही राज्याच्या क्रीडा धोरणाची शोकांतिका आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे