कुणबी समाजासह ओबीसी समाजाच्या विकासासाठी संघटन होण्यासह ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत नेतृत्व आणि सत्ता आपल्या हातात असली पाहिजे. त्यासाठी साऱ्यांनी ‘माझे मत, माझा नेता, माझा पक्ष आणि माझीच सत्ता’ असा विचार रूजवून बहुजन समाजाने ओबीसी झेंड्याखाली एकत्रित येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी केले. कुणबी समाजोन्नती संघाचे संस्थापक गुणाजी माळी यांची १०३ वी पुण्यतिथी तालुक्यातील कशेळी येथे साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात श्री. बावकर बोलत होते.
या वेळी कुणबी समाजोन्नती संघाचे माजी सरचिटणीस मधुकर तोरस्कर, राजापूर शाखेचे अध्यक्ष शिवाजी तेरवणकर, ग्रामीण शाखा तालुका राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले, उपाध्यक्ष रमेश सूद, सत्यवान कणेरी, सरचिटणीस चंद्रकांत जानस्कर, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, उपाध्यक्ष प्रकाश लोळगे आदी उपस्थित होते. श्री. नागले यांनी नेतृत्व करणारी नवी पिढी घडवून त्यांच्या हातामध्ये सत्ता देत समाज विकास साधणे गरजेचे असल्याचे मत मांडले. उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती साधण्यासाठी तरुणांना पाठबळ देण्याचे आश्वासन मांडवकर यांनी दिले. तोरस्कर यांनी सामाजिक विकासासामध्ये तरुणांनी योगदान देण्याचे आवाहन केले.