सरकारने वाहतूकदार व चालकाविरोधात केलेल्या काळ्या कायद्या विरोधात वाहतूकदार संघटना व चालक आक्रमक झाले असून बुधवारी सकाळी ६ ते गुरुवारी सकाळी ६’ वाजेपर्यंत तब्बल २४ तास चिपळूणात संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अन्यायी कायद्याचा निषेध करण्यासाठी शहरातून भव्य अशी रॅली देखील काढण्यात येणार आहे. त्यामुळे चिपळूणात सलग २४ तास सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.
सरकारने सर्व प्रकारच्या खाजगी वाहतूक, वाहतूकदार आणि चालकांसाठी नवीन नियमावली तयार करून तसा नवीन कायदाच अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सदरचा कायदा हा अन्यायकारक असून तो कोणत्याही स्वरूपात लागू होता कामा नये अशी भूमिका घेत राज्यातील वाहतूकदार संघटना व चालकांनी त्या कायद्याविरोधात दंड थोपटले होते. त्यावेळी संपूर्ण राज्यात वाहतूक संप करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी देखील झाली होती. परंतु सरकारकडून वेळीच दखल घेऊन चर्चा करण्यात आली आणि वाहतूक बंदचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला होता.
आज बंद – दरम्यान अद्याप तरी सरकारने त्यासंदर्भात योग्य ती भूमिका जाहीर केलेली नसल्याने वाहतूकदार संघटना व चालक मालक पुन्हा आक्रमक बनले आहेत. त्याचे परिणाम आता सर्वत्र उमटू लागले असून चिपळूण मधील सर्व वाहतूकदार संघटना तसेच चालक मालकांनी एकत्र येत सरकारच्या त्या काळ्या कायद्याविरोधात जोरदार आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सर्व सर्वप्रकारच्या खाजगी वाहतुकीचा समावेश करण्यात आला आहे. चिपळूणात बुधवारी सकाळी ६ वाजले पासून सर्व प्रकारची वाहतूक करणारी वाहने, तसेच रिक्षा व्यवसाय गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहेत. तसेच सरकारने जारी केलेल्या कायद्याचा निषेध नोंदवण्यासाठी चिपळूण शहरातून मोठी रॅली देखील काढण्यात येणार आहे. वाहतूकदार संघटना व चालक मालकांनी मंगळवारी या संपाची घोषणा केली असून होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.