तालुक्यातील कळंबणी येथे वास्तव्यास असलेल्या व कळंबणी आपेडे फाटा येथील एका बांधकाम साईटवर दि. ११ मार्च २०२५ रोजी दुपारी आढळून आलेल्या अकबर अबू शेख या बांगलादेशी नागरिकाला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस. एम. चव्हाण यांनी एक वर्षे कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील कळंबणी येथे वास्तव्यास असणारा अकबर अबू शेख हा बांगलादेशी नागरीक कळंबणी आपेडे फाटा येथील हॉटेल स्वामीलीला जवळील बांधकाम साईटवर दि.११ मार्च २०२५ रोजी दुपारी आढळून आल्यानंतर त्याला येथील पोलीसांनी ताब्यात घेतले. दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार फिर्यादी आशिष वसंत शेलार यांनी फिर्याद दाखल केल्यानुसार गुन्हा रजि. नं. ७२/२०२५, पारपत्र भारतात प्रवेश नियम १९५० चा नियम ३ सह-६, परकीय नागरिक आदेश १९४८ परी. ३ (१) (अ), परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
हा खटला खेड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात केस नं. ५९/२०२५ प्रमाणे चालविण्यात आला. सरकारी वकील म्हणून अॅड. श्रीमती विद्या गायकवाड यांनी काम पाहिले. या गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी केला होता. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी म्हणून हवालदार ४६९ श्री. गायकवाड यांनी काम पाहिले. या खटल्याची अंतिम सुनावणी शनिवार दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी झाली. यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस. एम. चव्हाण यांनी आरोपी अकबर अबू शेख याला परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे दोषी ठरवून एक वर्षाचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

