रत्नागिरीतील बारसू गावात रिफायनरीचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. रिफायनरीच्या या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी भाजपचे माजी खासदार निलेश राणे बारसू गावात आले होते. यावेळी त्यांना आंदोलकांनी घेराव घालून जाब विचारला. जोपर्यंत रिफायनरी प्रकल्प रद्द होणार नाही, तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा या आंदोलकांनी घेतला. या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केल्याने बारसूतील वातावरण तापलं आहे. पोलीस बंदोबस्तात निलेश राणेनी ग्रामस्थांची भेट घेतली पण ग्रामस्थ काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याने केवळ घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार हे रिफायनरीचे दलाल आहे. ते रिफायनरीचे समर्थक आहेत. त्यामुळे बारसूत रिफायनरी प्रकल्प राबवण्याचा घाट घालत आहे. त्याला आमचा कडाडून विरोध असून ग्रामस्थांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
विनायक राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. बारसूसह आजूबाजूच्या सहा गावात १०० टक्के ग्रामस्थांचा विरोध आहे. पण रिफायनरीचे दलाल त्या ठिकाणी जात आहेत. सरकारच रिफायनरीच्या दलालांचं आहे. त्यामुळे आंदोलकांचं प्रामाणिकपणे म्हणणं ऐकून घेतलं जात नाहीये. सरकारी धाक दाखवून घाबरवले जात आहे. पोलिसांची देखील मोठ्या प्रमाणात दादागिरी सुरू आहे. ४०० लोकांना तडीपारीच्या नोटिशी दिल्या आहेत. सरकार आणि रिफायनरीच्या दलालांकडून हा अन्याय सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत, असं विनायक राऊत म्हणालेत.